ताज्या घडामोडी

हरदडा-उमरखेड रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

हरदडा-उमरखेड रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

 

३० जूनपर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन; रुग्णवाहिकेला वाट देऊन आंदोलकांनी जपली माणुसकी

 

ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हरदडा ते उमरखेड रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झालेल्या ढाणकी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आज हरदडा फाटा येथे आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पावसाळा जवळ आला असतानाही रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. विशेष बाब म्हणजे आमदार किसन वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून डपडे वाजून निषेध व्यक्त करण्यात आला

 

 

रस्ता खोदून ठेवल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुरड्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असून दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना इजा होत आहे. तसेच प्रवाशांचे कपडे खराब होणे आणि अवकाळी पावसामुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व समस्यांमुळे एका महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली.

 

जी.एन.आय. कंपनीचे अभियंता संजय मानापुरे यांनी आंदोलकांना भेट देऊन ३० जूनपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उमरखेड आणि बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 

 

या आंदोलनात बाळासाहेब चंद्रे पाटील, नगर उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, शेख सादिक, प्रशांत विनकरे, संबोधी गायकवाड, रुपेश भंडारी, बाबुराव नरवाडे, प्रणिती कांबळे, सय्यद माजिद, सुनील बुरसे, संभाजी गोरटकर, प्रशांत जोशी, गजानन मिटकरे, राहुल नरवाडे, मुन्नाभाई, बशीर भाई, यांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनात जपली माणुसकी

आंदोलन सुरू असतानाच एक रुग्णवाहिका आणि एका ऑटोमधून बालरुग्ण उपचारासाठी जात होते. आंदोलनाची तीव्रता असतानाही आंदोलकांनी माणुसकीचे भान राखत या दोन्ही वाहनांना तातडीने रस्ता मोकळा करून दिला.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *