पुसद न्यूज – वाढती दहशत; पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या.
अवैध रेती तस्करीविरोधात आवाज उठवणाऱ्यांना लक्ष्य; कठोर कारवाई व संरक्षणाची पत्रकारांची मागणी.
यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.
अवैध रेती तस्करीविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने पुसद शहरात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुसद येथील विविध वृत्तसंस्थांच्या पत्रकारांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करून आरोपींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यासह पत्रकारांना तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, अवैध रेती उत्खनन व चोरट्या वाहतुकीमुळे शासनाच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असून या अवैध व्यवसायातून रेतीमाफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. महसूल व पोलीस विभागाच्या कारवाईदरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले, दमदाटी, मारहाण तसेच जीवे मारण्याचे प्रयत्न होत असल्याने कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवरही दबाव निर्माण झाला आहे.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि वृत्तमाध्यमांनी केलेल्या वृत्तांकनामुळे अनेकदा प्रशासनाला अवैध रेती तस्करीविरोधात कारवाई करावी लागते. मात्र, त्याचाच राग काढत रेतीमाफियांनी पत्रकारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर वंदे भारत न्यूजचे प्रतिनिधी शेख महेबूब शेख इब्राहिम यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून अवैध रेती तस्करीसंदर्भातील बातम्यांचा उल्लेख करत शिवीगाळ केली व “बंदुकीची गोळी घालून ठार मारतो,” अशी धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी वसंत नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एन.सी.आर. क्र. ०६०२/२०२५ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. मात्र, एवढ्या गंभीर धमकीनंतरही केवळ एनसीआर नोंदवून पुढील कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून यामुळे रेतीमाफियांचे मनोबल वाढत असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली.
पत्रकारांवरील अशा धमक्या या केवळ प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी नसून लोकशाही व्यवस्थेवरील आणि महसूल व पोलीस प्रशासनालाच दिलेले अप्रत्यक्ष आव्हान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, धमकीग्रस्त पत्रकाराला पोलीस संरक्षण द्यावे आणि अवैध रेती तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन अॅड. अनिल ठाकूर, अहमद पठाण, ज्ञानेश्वर मेटकर, मारोती भस्मे, उमेश जाजू, संजय रेक्कावार, नवाज अली, मनीष दशरथकर, दीपक धर्माधिकारी, सय्यद अकिब रिझवी, अॅड. प्रदीप नरवाडे, अब्दुल हमीद, विष्णू धुळे, कैलास श्रावणे, किशोर कांबळे, अनिल चेंडकाळे, दिनकर गुल्हाने, बाबूलाल राठोड, सुनील सिंह काकण, बाबा खान, विजय निखाते, सुनील गंगाखेडे, प्रकाश खिल्लारे, मोहम्मद हनीफ, शब्बीर शेख, राजू सोनूने, बाबाराव उबाळे, मुब्बशीर शेख, शंकर माहुरे, राजेश ढोले आदी पत्रकारांनी संयुक्तपणे सादर केले.




