रोडवर भीषण स्फोटाने थरार; वेल्डिंग करताना गॅस सिलेंडर फुटला!
दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक चर्चा; ४ ते ५ जखमींना नांदेडला हलविल्याची माहिती — पोलिसांचा घटनास्थळी ताफा
महागांव एस. के शब्बीर यांची बातमी.
उमरखेड : शहरातील ढाणकी रोडवर शनिवारी वेल्डिंगच्या दुकानात झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. विहिरीमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करण्यासाठी आणण्यात आले असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या भागाची वेल्डिंग करण्यासाठी संबंधित वाहन ढाणकी रोडवरील एका वेल्डिंग दुकानात आणण्यात आले होते. यापूर्वी दोन ते तीन वेल्डिंग दुकानदारांनी अशा प्रकारचे वेल्डिंग करण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, एका दुकानदाराने वेल्डिंग करण्याचे धाडस केले.
वेल्डिंग सुरू असतानाच ठिणगी ट्रॅक्टरमधील ‘तोट्या’वर पडल्याने अचानक स्फोट झाला. त्यानंतर जवळ असलेल्या गॅस सिलेंडरलाही स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेत दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा असून, चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, मृत आणि जखमींची अधिकृत संख्या तसेच त्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मोठ्या उपस्थितीमुळे ढाणकी रोड परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासह स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
अपघात की घातपात? तपासाकडे लक्ष
या घटनेमागे केवळ वेल्डिंगदरम्यान झालेला अपघात आहे की अन्य कोणता प्रकार आहे, याबाबतही पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती आहे. घटनास्थळाची पाहणी, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि स्फोटाचे कारण याबाबतचा तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरची वेल्डिंग गॅस सिलेंडरच्या जवळ करण्याची परवानगी किंवा सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले होते का? यासह अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.
घटनास्थळावरील परिस्थिती आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार प्राथमिक स्वरूपात ही बातमी देण्यात येत असून, पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर मृतांची संख्या, जखमींची नावे आणि स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




