सावळेश्वर शिवारात रानडुकराचा कापूस वेचणाऱ्या महिलेवर भरदुपारी हल्ला; प्रकृती चिंताजनक.
ढाणकी प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे.कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच शेतशिवारात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सावळेश्वर येथील शेतमजूर महिला करुणा दलितांनंद काळबांडे वय 35 वर्ष यांच्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. करुणा काळबांडे शेतात कापूस वेचण्याचे काम करत होत्या. भरदुपारी अचानक दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. हल्ल्यात गंभीर जखमा झाल्याने त्यांना तातडीने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमा खोल आणि गंभीर असल्याने ढाणकी येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.
भरदुपारी झालेल्या या हल्ल्यामुळे शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांमध्ये मोठी भीती पसरली आहे. कापूस वेचणीचा महत्त्वाचा काळ असताना वन्यप्राण्यांच्या या हल्ल्यांमुळे मजुरांनी शेतात जाण्यास धास्ती घेतली आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन तत्काळ पंचनामा करावा आणि पीडित महिलेच्या उपचाराचा खर्च उचलून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




