हिमायतनगरचा वनवास: बाजूच्या गावात हाय-टेक बसस्थानक, मग तालुक्याच्या नशिबी ‘धुळधाण’ का?
हिमायतनगर ( प्रतिनिधी शेख खयुम

हिमायतनगर तालुका होऊन २७ वर्षे उलटली, तरीही या शहराला हक्काचे बसस्थानक मिळू शकले नाही. धक्कादायक वास्तव हे आहे की, शेजारील तामसा आणि श्रीधर खेड सारख्या ग्रामीण भागात चकाचक हाय-टेक बसस्थानके आणि रस्त्यावर दुभाजक (Dividers) उभे राहिले आहेत. मग तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या हिमायतनगरवरच हा अन्याय का? हा केवळ विकासकामांचा अनुशेष नसून राजकीय अनास्था आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना आहे.
संविधानाने दिलेल्या सन्मानाची पायमल्ली
भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र, हिमायतनगरमध्ये प्रवाशांना उघड्यावर, अंगावर धूळ झेलत तासनतास ताटकळत बसावे लागते. विकासासाठी येणारा निधी नेमका मुरतो कुठे? गरिबांच्या हक्काचा पैसा राजकीय दबावाखाली दाबला जात आहे का, असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.
महिला आणि सामान्यांचे मरणप्राय हाल
श्रीमंत आणि राजकारणी आपल्या अलिशान गाड्यांतून फिरतात, पण खरी आबाळ होते ती गरीब जनता आणि महिलांची. एसटी बसचे वेळापत्रक निश्चित नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून ‘एक्सपायर’ झालेल्या आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या असुरक्षित खाजगी वाहनांचा (काली-पिवळी) आधार घ्यावा लागतो. कडक ऊन असो वा मुसळधार पाऊस, डोक्यावर छप्पर नसल्याने अबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत.
आमच्या प्रमुख मागण्या:
१. हिमायतनगर शहरात तात्काळ सुसज्ज आणि सर्व सोयींयुक्त बसस्थानकाचे बांधकाम सुरू करा.
२. शेजारच्या गावांप्रमाणे शहराच्या मुख्य रस्त्यांवर दुभाजक आणि सुशोभीकरण करण्यात यावे.
३. प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी अवैध आणि असुरक्षित वाहतूक थांबवून एसटी फेऱ्या वाढवाव्यात.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात हिमायतनगरची जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा या निमित्ताने दिला जात आहे.



