ताज्या घडामोडी

उमरखेड-महागांव तालुक्यासह अनेक जागी जिओचे नेटवर्क ‘जाम’; महागाड्या रिचार्जवर ग्राहक त्रस्त! ​दोन दिवसांपासून रेंज गायब; डेटाचे नुकसान भरून मिळणार का? ग्राहकांचा सवाल

उमरखेड-महागांव तालुक्यासह अनेक जागी जिओचे नेटवर्क ‘जाम’; महागाड्या रिचार्जवर ग्राहक त्रस्त!

​दोन दिवसांपासून रेंज गायब; डेटाचे नुकसान भरून मिळणार का? ग्राहकांचा सवाल

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

सध्या जिओ कंपनीच्या नेटवर्कचा सर्वत्र मोठा गाजावाजा होत असला तरी, ढाणकी शहरात मात्र ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिओचे नेटवर्क पूर्णपणे कोलमडल्याने ग्राहक संतप्त झाले असून, “महागड्या रिचार्जचा फायदा काय?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

 

​ढाणकी परिसरात जिओचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. सुरुवातीला चांगले नेटवर्क मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांनी जिओला पसंती दिली. मात्र, गेल्या ४८ तासांपासून शहरात जिओची रेंज पूर्णपणे गायब झाली आहे. ज्या ठिकाणी रेंज दिसते, तिथे डेटा चालत नाही आणि कॉलिंगमध्ये वारंवार अडथळे येत आहेत.

 

​सध्या मोबाईल रिचार्जचे दर गगनाला भिडले आहेत. शेकडो रुपये खर्च करून ग्राहक डेटा आणि कॉलिंग पॅक विकत घेतात. मात्र, दोन दिवसांपासून सेवा ठप्प असल्याने ग्राहकांचा पैसा वाया जात आहे. “आम्ही पैसे पूर्ण भरतो, मग सेवा का मिळत नाही?” असा प्रश्न संतप्त ग्राहक विचारत आहेत.

 

​नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांचा दैनंदिन डेटा वापरता आला नाही. यामुळे या दोन दिवसांचे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने ग्राहकांना अतिरिक्त डेटा किंवा व्हॅलिडिटी वाढवून द्यावी, अशी मागणी ढाणकीतील ग्राहकांनी केली आहे.

 

​आजकाल अनेक छोटी-मोठी कामे, बँकिंग व्यवहार आणि ऑनलाईन शिक्षण मोबाईल इंटरनेटवर अवलंबून आहे. जिओचे नेटवर्क नसल्याने व्यापार्‍यांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले असून सर्वसामान्यांचे संपर्क तुटले आहेत. कंपनीने लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्ववत करावी, अन्यथा ग्राहक इतर कंपनीकडे वळतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *