महागांव / हिवरा ते टेंभी मार्गावर खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र: रस्ता झाला आती धोकादायक!
यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख
महागाव: तालुक्यातील हिवरा ते टेंभी या मार्गावर गेली दोन वर्षेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला असून त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि भाविक यांचे हाल होत आहेत. रोजच्या प्रवासात शेकडो वाहने या मार्गावरून जात असतात परंतु हा खड्डा मोठ्या अपघातांना आमंत्रण देत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली कळत नाही आणि दुचाकीस्वार घसरून पडतात, चारचाकी वाहनांचे टायर फुटतात, सस्पेंशन तुटतात, तर काही वेळा गंभीर अपघात होतात. गेल्या काही महिन्यांत तीन ते चार मोठे अपघात येथे घडले असून एका दुचाकीस्वाराचे पाय मोडले, तर दुसऱ्या घटनेत चारचाकी वाहन रस्त्याबाहेर जाऊन मोठे नुकसान झाले. या रस्त्याने हिवरा ते कासारबेहळ मार्गे थेट श्रीक्षेत्र माहूरला जाता येते. माहूर हे विदर्भातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्यामुळे दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणावर असते. शाळकरी मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. विशेष म्हणजे टेंभी येथील साईबाबा शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या खड्ड्यामुळे रोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पालक भीतीने मुलांना शाळेत पाठवतात. रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने रुग्णांची गैरसोय होते, शेतमाल वाहतुकीत अडथळे येतात, भाविकांना त्रास होतो, ग्रामस्थांच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण होतात. ग्रामस्थांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, पण कोणीही गंभीरतेने दखल घेतली नाही. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी स्वतः पैसे गोळा करून मुरुम टाकून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला, पण पावसाळ्यात तो प्रयत्न व्यर्थ गेला. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे आणि आता संताप उफाळून आला आहे. तेव्हा तात्काळ हा खड्डा नाही बुजवल्यास ग्रामस्थांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



