कृष्णापुर तांड्यात गावठी दारूचा धुमाकूळ गावकऱ्यांची पोलिसांकडे तक्रार – “दारू बंद करा, अन्यथा आंदोलन करू”
ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकटे
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव , पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर तांडा येथे गावठी व विदेशी दारूची बिनधास्त विक्री सुरू आहे. यामुळे संपूर्ण तांडा व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी अखेर “समस्त गावकरी मंडळी, कृष्णापुर तांडा” च्या वतीने बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना लेखी तक्रार देऊन दारू तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, तांड्यात मोठ्या प्रमाणात गावठी आणि विदेशी दारू विकली जात आहे. त्यामुळे 12 वर्षांखालील मुलांपासून ते 50 वर्षांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोक व्यसनाधीन झाले आहेत. यामुळे घराघरात भांडणे, मारहाणीचे प्रकार वाढले आहेत.
तक्रारीतील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे शेजारील पिंरजी आणि गोविंदपूर या गावांमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे तेथील नागरिक दारू पिण्यासाठी रात्री-बेरात्री कृष्णापुर तांड्यात येतात आणि गोंधळ घालतात. यामुळे तांड्यातील महिलांची व मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
अर्जात गावकऱ्यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे की, “आमच्या तांड्यातील दारू तात्काळ बंद करावी. अन्यथा आम्हाला नाईलाजाने दारूबंदी आंदोलन करावे लागेल.”
गावकऱ्यांची प्रशासनाकडून अपेक्षा
तांडा हा संवेदनशील भाग आहे. येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.
मद्यविक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्याची आणि तांड्यात कायमस्वरूपी गस्त वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे आता संपूर्ण तांड्याचे लक्ष लागले आहे.
कृष्णापुर तांड्यातील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इसामावर दंडात्मक कारवाई करू अवैध दारू विक्री बंद करू अजून आम्ही काही गाव दारूमुक्त केले आहे कृष्णापुर तांडा ही दारु मुक्त करू
बिटरगाव ठाणेदार
पांडुरंग शिंदे




