उमरखेड आगाराचा ‘सावळा गोंधळ’ चव्हाट्यावर; प्रादेशिक.
व्यवस्थापकांकडे तक्रारीचा पाढा!
ग्रामीण फेऱ्या रद्दमुळे प्रवाशांचे हाल; विभाग नियंत्रकांच्या ‘आळशी’ कारभारावर प्रवाशी मंडळाचा संताप
हम बोले तो कायदा अशी वर्तणूक
ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे
उमरखेड आगाराचा परिवहन कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असून, प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामीण भागातील बस फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत. यामुळे संतप्त झालेले माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे अध्यक्ष हिरासिंग चव्हाण यांनी थेट प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलगे यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था असुरक्षित झाली असून, अधिकारी केवळ खुर्च्या उबवण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आदिवासी व दुर्गम भागातील प्रवाशाकडे दुर्लक्ष दिनांक ३ मार्च २०२६ रोजी ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागातील मुक्कामी फेऱ्या अचानक रद्द झाल्या. या भागात खासगी अवैध वाहतूक पोहोचू शकत नाही, त्यामुळे केवळ एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ढाणकी हे ४५ हजार लोकसंख्येचे गाव असूनही, जिल्हा मुख्यालयाला जोडणारी एकमेव ‘ढाणकी-यवतमाळ’ बस वारंवार रद्द केली जाते. यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
’प्रवासी राजा’ दिनाचा फज्जा!
विभाग नियंत्रक कचवे यांच्या कार्यकाळात ‘प्रवासी राजा’ दिनाचा केवळ फार्स उरला आहे. प्रवाशांशी सौजन्याने वागण्याऐवजी त्यांच्या तक्रारींचा तिरस्कार केला जातो. तक्रार निवारणासाठी संपर्क साधला असता विभागीय जिल्हा वाहतूक अधिकारी दादाराव दराडे फोन उचलत नाहीत, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि “हम बोले तो कायदा” या वृत्तीमुळे ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे.
रस्त्यावर धावतायत ‘भंगार’ बसेस
ग्रामीण भागात पाठवल्या जाणाऱ्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. खिडक्या तुटलेल्या आणि इंजिन कमकुवत असलेल्या या ‘खिळखिळ्या’ बसेस प्रवासात वारंवार ब्रेकडाऊन होतात. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या या भंगार बसेस बंद करून चांगल्या बसेस देण्याची मागणी प्रवासी मंडळाने केली आहे.
“यवतमाळ जिल्ह्यातील नऊ डेपो ढेपाळले असून अवैध वाहतुकीचा धुमाकूळ सुरू आहे. वरिष्ठांनी उमरखेड आगाराच्या या भोंगळ कारभाराची कसून चौकशी करावी, अन्यथा माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ तीव्र आंदोलन छेडेल.”हिरासिंग चव्हाण (अध्यक्ष, माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ)




