
ढाणकी नगरपंचायतीची अग्निशामक वाहने धूळ खात; तीन वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांअभावी लाखो रुपयाची यंत्रणा ठरतेय निष्प्रभ!
८ दिवसांत कर्मचारी नियुक्त न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा; काँग्रेस कमिटी व संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे
शासनाकडून लाखो रुपये खर्च करून ढाणकी नगरपंचायतला उपलब्ध करून देण्यात आलेली अग्निशामक गाडी आणि अग्निशामक दुचाकी (मोटर सायकल) गेल्या तीन वर्षांपासून केवळ कर्मचाऱ्यांअभावी जागेवरच धूळ खात पडून आहे. प्रशासनाच्या या कमालीच्या उदासीनतेमुळे आणि हलगर्जीपणामुळे शहरात वारंवार भीषण आगीच्या घटना घडून नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, पुढील ८ दिवसांत या वाहनांवर पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ढाणकी शहर काँग्रेस कमिटी व स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.
सभापती.बाळासाहेब चंद्रे व गजानन मिटकरे शहर आध्यक्ष काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली कर निरीक्षक नागेश बाबुलगावे यांना निवेदन सादर करण्यात आले.सुमारे तीन वर्षांपूर्वी ढाणकी शहरात आगीच्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने अग्निशामक गाडी आणि दुचाकी नगरपंचायतला दिली होती. मात्र, तीन वर्षे उलटूनही नगरपंचायत प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणेवर कोणत्याही प्रकारची पदभरती किंवा कर्मचारी नियुक्ती केली नाही. परिणामी, शहरात किंवा परिसरात आग लागल्यास हक्काची यंत्रणा असूनही ती वेळेवर धावून जाऊ शकत नाही, अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपंचायतीकडे अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असतानाही, केवळ कर्मचाऱ्यांअभावी ती वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.मागील तीन वर्षांत अशा अनेक घटनांमुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील ८ दिवसांच्या आत अग्निशामक वाहनांवर आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.”दिलेल्या मुदतीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास नगरपंचायत प्रशासनासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. आसा इशारा बाळासाहेब चंदे मा. सभापती (कृ.उ.बा.स.), गजानन मिकरे अध्यक्ष, ढाणकी शहर काँग्रेस,सचिन तोटेवाड मा. जि.प. सदस्य ,शेख . जहीर शे. मौला उपनगराध्यक्ष,अमोल तुपेकर,रमेश गायकवाड.मा. सदस्य, पं.स.,रुपेश भंडारी.तालुकाध्यक्ष, व्यापारी काँग्रेस,जबाज सर,शे. आमु भाई,ओमराव चंद्रे,किशोर ठाकुर,खंडेराव लकडे,प्रशांत शेवाळकर,बाबुराव नरवाडे,राहुल नरवाडे.अध्यक्ष.युवक काँग्रेस,अमोल मुनेश्वर,प्रविण जैन,शिवाजी वैद्य,शबनबीर शे.आयुब,आनंद पोपुलवाड,राहुल पाटिल चंदे.शे.शबीर.तसेच यापुढे आगीमुळे नागरिकांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्यास सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड दमही नागरिकांनी दिला आहे.



