ताज्या घडामोडी

तुकाराम मुंडेंचा धसका : ढाणकीतील अवैध पानटपऱ्यांना टाळे, मोठ्या माफियांवर कारवाईची मागणी.

तुकाराम मुंडेंचा धसका : ढाणकीतील अवैध पानटपऱ्यांना टाळे, मोठ्या माफियांवर कारवाईची मागणी.

 

 

ढाणकी (प्रतिनिधी):सध्याच्या आधुनिक युगात सर्वत्र भेसळ आणि अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील काही काळापासून प्रशासकीय सुस्तीमुळे हे धंदे बोकाळले होते. मात्र, धडक आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या लौकिकाला साजेसा कारभार सुरू केला आहे.

 

पानटपऱ्या बंद, अवैध विक्रेत्यांत खळबळ

मुंडे यांच्या कारवाईच्या धास्तीने ढाणकी परिसरातील अनेक पानटपऱ्या आणि अवैध विक्रेते बंद झाले आहेत. गुटखा, सुगंधी तंबाखू, हातभट्टीची दारू आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर मुंडे यांचे विशेष पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे. “अवैध पदार्थांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये प्रशासन

तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकत असल्याचे लक्षात घेऊन मुंडे यांनी आरोग्याला घातक ठरणाऱ्या पदार्थांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.

 

नागरिकांची मागणी : फांद्या नको, मुळावर घाव घाला

मात्र, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा ते झाड मुळासकट उपटून टाकले पाहिजे,” असे मत निर्व्यसनी नागरिकांनी मांडले.

 

मोठ्या कंपन्यांवर ‘सील’ची अपेक्षा

गुटखा आणि बनावट उत्पादने तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्या व मुख्य गोदामांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुख्य पुरवठादारच बंद झाले तर छुपी विक्री आपोआप थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता तुकाराम मुंडे मोठ्या माफियांवर कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *