ताज्या घडामोडी

खरे हिरो म्हणजे महामानवच; तरुणांनी बाबासाहेबांचाआदर्श घ्यावा आयुक्त समीर वानखेडे यांचे प्रेरणादायी आवाहन.

खरे हिरो म्हणजे महामानवच; तरुणांनी बाबासाहेबांचाआदर्श घ्यावा आयुक्त समीर वानखेडे यांचे प्रेरणादायी आवाहन.

 

उमरखेड : मिलिंद चिकाटे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उमरखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित आयुक्त समीर वानखेडे यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला.

आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आजची तरुण पिढी सिनेसृष्टीतील नट-नटींना आपले हिरो मानते, मात्र खरे हिरो हे आपल्या देशाचे महामानव आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श तरुणांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असून, पालकांनीही आपल्या मुलांना महामानवांचे विचार सांगणे आवश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले.

समीर वानखेडे पुढे म्हणाले की, “मी आयुष्यात अनेक मोठ्या प्रकरणांमुळे चर्चेत आलो, पण कधीही कोणासमोर झुकलो नाही. बाबासाहेबांचे विचार अंगीकारूनच मी पुढे जात आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांच्या विचारांचा आणि धम्माचा प्रचार करत राहीन.”

त्यांनी एक महत्त्वाकांक्षी स्वप्नही व्यक्त करीत “प्रत्येक घरातून एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी निर्माण झाला, तरच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

याप्रसंगी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित जयदीप कवाडे ( राज्यमंत्री दर्जा )यांनीही आपल्या भाषणात समाजातील वास्तवावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या’ मात्र आज काल जयंती उत्सवांमध्ये लोकांची गर्दी असते, पण प्रबोधनपर कार्यक्रमांकडे दुर्लक्ष होते, ही दुर्दैवी बाब आहे.” त्यांनी युवकांना आवाहन केले की, गाण्यांच्या नादातून बाहेर पडून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव कांबळे प्रमुख उपस्थितीत आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष तेजश्री जैन, वंदनाताई साहेबराव कांबळे डॉ .प्रेम हनवते, नगरसेवक तथा सभापती विरेंद्र खंदारे ‘नगरसेविका कविता काळबांडे, प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष संतोष नितळे आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. अनिल काळबांडे , उत्तमराव शिंगणकर, पांडूरंग धुळे , राहूल काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

हा प्रबोधन पर्व केवळ उत्सव न राहता विचारांचे आणि प्रेरणेचे केंद्र बनत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा राजाभाऊ धांडे , प्रा गजानन दामोधर तर आभार संतोष निथळे यांनी मानले .

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *