बिटरगाव येथील मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात तर्क-वितर्कांना उधाण
प्रशासकीय निष्काळजीपणा की घातपात? नागरिक व्यक्त करताहेत शंका
ढाणकी (प्रतिनिधी):
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु. येथे यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या आनंदा अशोक वड्डेल्लू (वय १६, रा. बेलगाव मंडळ कबीर) या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या घटनेबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही घटना केवळ अपघात आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
आनंदा हा आपल्या आजोबांकडे बिटरगाव येथे राहून शिक्षण घेत होता. बुधवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास गावात सुरू असलेली यात्रा पाहण्यासाठी तो घराबाहेर पडला. रात्रीच्या अंधारात जमिनीच्या लेव्हलला असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने तो त्यात कोसळल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्याला तातडीने ढाणकी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सुरक्षेचा अभाव: विहीर जमिनीच्या पातळीवर असूनही तिला संरक्षक भिंत किंवा जाळी का नव्हती? यात्रेच्या काळात गर्दी असताना प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची सुरक्षितता का तपासली नाही?
अंधाराचे साम्राज्य: यात्रेनिमित्त परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था होती का?
रात्रीच्या वेळी नेमकी ही दुर्घटना कशी घडली, याबाबत काही नागरिक दबक्या आवाजात शंका व्यक्त करत आहेत.
तपास सुरू:
या प्रकरणाचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार संतोष चव्हाण आणि पो. अंमलदार दत्ता कवडेकर करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बेलगाव आणि बिटरगाव परिसरात या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.



