आर्णी ( इरफान रज़ा ):
जगातील एकमेव पुस्तकासाठी बांधल्या गेलेले घर म्हणून ख्याती असलेले ‘राजगृह’ या वास्तूवर भ्याड हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व आरोपीचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून विश्वविख्यात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जवळ असलेल्या व त्यांच्या स्वयंलिखित ग्रंथ संपदेसाठी ‘राजगृह’ नावाची वास्तू बांधली. जगात एकमेव ‘पुस्तकांचे घर’ म्हणून लौकिक असलेल्या व भारतीयांसाठी प्रेरक असलेल्या राजगृहावर दि. 7 जून ला अज्ञात व्यक्ती कडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राजगृहाच्या परिसरातील झाडांच्या कुंड्याची नासधूस करण्यात आली. तसेच खिडक्यांच्या काचांवर दगडफेक करून काचा फोडल्या गेल्या. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम सेवा संघ आर्णीच्या वतीने देण्यात आले. यावेळी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश हिरोळे, राहुल मुजमुले, आरिफ शेख, क्षितिज भगत, कमलेश खरतडे, प्रशिक मुनेश्वर, सुरज भगत, सुजित पाटील, सुधाकर गवई, चेतन इंगळे, संदेश भगत, विशाल मुरादे देवेश खोब्रागडे व तसेच मुस्लिम सेवा संघचे तालुका अध्यक्ष शेख राजीक कुरेशी, सैय्यद मोहम्मद सैय्यद रोशन, साजिद हरूण मलनस, शेख सुलतान, शेख शफिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.