ताज्या घडामोडी

खरीप हंगाम उलटला तरी पीक विम्याची प्रतीक्षाच; शेतकरी हवालदिल!

खरीप हंगाम उलटला तरी पीक विम्याची प्रतीक्षाच; शेतकरी हवालदिल!

 

विमा कंपन्यांचा ‘तारीख पे तारीख’चा खेळ; राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष असल्याने आंदोलनाचा इशारा

 

ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

उमरखेड तालुक्यासह ढाणकी परिसरातील नदीकाठच्या गावांमध्ये चालू वर्षी पावसाने मोठे तांडव माजवले होते. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हक्काच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाई मिळेल या आशेवर विमा हप्ता भरला, मात्र खरीप हंगाम संपूनही अद्याप विम्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

 

गेल्या वर्षी शासनाने ‘एक रुपयात पीक विमा’ योजना राबवली होती, परंतु यावर्षी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पीक विम्याचे पैसे भरावे लागले आहेत. हेक्टरी लागणारा पूर्ण खर्च शेतकऱ्यांनी सोसला आहे. तरीही, पीक विमा कंपन्यांकडून भरपाई देण्याबाबत केवळ आश्वासन दिले जात असून ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे. दुसरीकडे, राजकीय नेते केवळ राजकारणात व्यस्त असून शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

 

 

नदीकाठच्या पट्ट्यात व इतर भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने कापूस, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या काळात पीक विम्याचा मोठा आधार असतो. मात्र, विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे “विम्याचे पैसे मिळणार की नाही?” अशी भीती आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

 

पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये वसूल करणाऱ्या कंपन्या नुकसान भरपाई देताना मात्र हात आखडता घेत आहेत. शासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून विमा कंपन्यांना आदेश द्यावेत, अन्यथा ढाणकी परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची मानसिकता तयार झाली आहे, तर काही संतप्त शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.

खरीप हंगाम संपून आता रब्बीची हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे, अशा वेळी जुन्या नुकसानीचे पैसे न मिळाल्यास पुढची शेती कशी करावी, असा यक्षप्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *