उमरखेड आगाराची पहिली आंतरराज्य बस धावली; ढाणकी-किनवटमार्गे ‘आदिलाबाद’ सेवा सुरू!
पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचा लढा फळाला
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे
उमरखेड आगाराच्या इतिहासात प्रथमच आंतरराज्य बस सेवेचा श्रीगणेशा झाला असून, आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी उमरखेड-ढाणकी-किनवट-आदिलाबाद या बसला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यवतमाळचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या पत्राची दखल घेतल्याने ही सेवा सुरू झाली असून, यामुळे ढाणकी परिसरातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
उमरखेड आगारातून तेलंगणा राज्यासाठी थेट बस सेवा नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. अखेर ही मागणी मान्य झाली असून, उमरखेड ते आदिलाबाद अशी आंतरराज्य फेरी सुरू झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
आज सकाळी ही बस ढाणकी बसस्थानकावर पोहोचताच प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी जल्लोष केला. बसला झेंडूच्या फुलांनी आणि उसाच्या धाड्यांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. यावेळी चालक शेख फारूक व वाहक रवी बाळसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘माधवराव मिटकरे प्रवासी मंडळा’च्या वतीने करण्यात आले होते. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन आजेगावकर यांच्या हस्ते चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ढाणकी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष शेख शाहरुख, सचिव शेख इरफान, प्रशांत आरेवाड, बंटी फुलकोडवार, शेख जब्बार उपस्थित होते. तसेच प्रवासी मंडळाचे सचिव हिरासिंह चव्हाण, उपाध्यक्ष नाथा पाटील, सौरभ मिटकरे, शैलेश साखरे, ढाणकी बसस्थानक प्रमुख सुरेश मोरे आणि प्रदीप गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
उमरखेड प्रस्थान: सकाळी ७:३० वाजता
मार्ग: ढाणकी – टेबुरदरा – किनवट – अंबाडी – पिपळगावमार्गे आदिलाबाद.
माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान यांनी या सेवेबद्दल उमरखेड आगार व्यवस्थापकांचे आभार मानले. ही बस सेवा सुरू झाल्याने व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




