ताज्या घडामोडी

ढाणकी-टेंभुरदरा राज्यमार्ग की मृत्यूचा सापळा? साईडपट्ट्यांअभावी वाहने जातायत थेट नालीत!

ढाणकी-टेंभुरदरा राज्यमार्ग की मृत्यूचा सापळा? साईडपट्ट्यांअभावी वाहने जातायत थेट नालीत!

 

दोन वर्षांतच रस्त्याची दैना; लोकप्रतिनिधींच्या ‘मौना’मुळे ग्रामस्थांचा संताप, दुहेरीकरणासाठी एल्गार

 

ढाणकी: (प्रतिनिधी) मिलिंद चिकाटे

तेलंगणा राज्याला जोडणारा मुख्य दुवा असलेला ढाणकी-खरुस-टेंभुरदरा-कुरळी हा 233 क्र.राज्यमार्ग सध्या प्रवाशांसाठी ‘यमलोक’ ठरत आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले असूनही, निकृष्ट दर्जा आणि अरुंद रस्ता यामुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्याच्या कडेला साईडपट्ट्याच भरल्या नसल्याने समोरून वाहन आल्यास जागा देताना वाहने थेट नालीत कोसळत आहेत. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून आता रस्त्याच्या दुहेरीकरणासाठी येणाऱ्या काळात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येऊ शकते .

 

अवजड वाहतुकीचा ताण, रस्ता मात्र ‘सिंगल’

हा मार्ग आंतरराज्यीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, वाढलेली अवजड वाहतूक आणि रस्त्याची अत्यंत कमी असलेली रुंदी यामुळे ओव्हरटेक करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. ओव्हरटेकच्या नादात दररोज छोटे-मोठे अपघात होत असून रक्ताचे सडे पडत आहेत. रस्ता रुंद झाल्यास हे अपघात ५० टक्क्यांनी कमी होतील, असा विश्वास वाहनधारकांनी व्यक्त केला आहे.

 

रस्त्याचे काम नवीन असतानाही कडेला मुरूम टाकून साईडपट्ट्या भरण्याचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी, मोठी वाहने समोरून आल्यावर दुचाकीस्वारांना जागा मिळत नाही आणि त्यांची वाहने थेट रस्त्याला लागून असलेल्या खोल नालीत जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (उमरखेड) याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

 

ढाणकी-खरुस दरम्यान असलेला नाला हा प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. येथील पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने थोडा जरी पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहू लागते. परिणामी, तासनतास वाहतूक ठप्प होते. रस्ता राज्यमार्ग असूनही या पुलाच्या उंचीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. गेल्या पावसाळ्यामध्ये धानकीला शाळेत गेलेल्या मुली या पुलावर पाणी असल्यामुळे दोन दिवस शाळेतच मुक्कामी होत्या त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ढाणकी जवळ असलेल्या नाल्याच्या पुलाची उंची वाढवणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहे

 

 

या गंभीर प्रश्नावर स्थानिक नेतेमंडळी आणि लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर मौन पाळल्याचे चित्र आहे. सामान्य जनतेचे जीव जात असतानाही राज्यकर्ते गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या मार्गाचे तातडीने दुहेरीकरण आणि पुलाची उंची वाढवण्यात यावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी नेते मंडळाला बोलून दाखवत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *