सोंदाभी शाळेच्या आंदोलनाला यश; अखेर मिळाला हक्काचा शिक्षक.
प्रशासनाने घेतली दखल; नवनियुक्त शिक्षकाचे विद्यार्थ्यांकडून जल्लोषात स्वागत
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे
पैनगंगा अभयारण्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोंदाबी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर सुटला आहे. गेल्या शुक्रवारपासून (९ जानेवारी) पालकांनी पुकारलेला बहिष्कार आणि सोमवारी भर चौकात झाडाखाली भरवलेल्या शाळेच्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. मंगळवार, १३ जानेवारी रोजी नवनियुक्त शिक्षक शाळेत हजर झाल्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले आहे.
सोंदाबी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असूनही केवळ चार शिक्षक कार्यरत होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने ग्रामस्थांनी महिन्याभरापासून निवेदने देऊन शिक्षकांची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ९ जानेवारीपासून पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती गावातील चौकात उघड्यावर शाळा भरवून साजरी करण्यात आली होती. या अनोख्या आंदोलनाची दखल घेण्यास प्रशासनाला भाग पडले.
सततच्या पाठपुराव्यामुळे गटशिक्षणाधिकारी विजय बेटेवाड यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी तातडीने बालाजी पोतरे यांची नवीन शिक्षक म्हणून नियुक्ती केली. मंगळवारी केंद्रप्रमुखांसह नवनियुक्त शिक्षक पोतरे शाळेत दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आनंदाने शाळेत पाऊल ठेवले.
या यशस्वी आंदोलनात उपसरपंच मारुती पिलवंट, मारोती लुटे, बालसिंग खसावत, राजीव थोटे, देवसिंग साबळे, सिताराम रबडे, त्रिमूर्ती वाडेकर, दर्शन काळबांडे यांच्यासह अनेक पालकांनी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला होता. “आमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा लढा गरजेचा होता, अखेर प्रशासनाला जाग आली,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.




