ताज्या घडामोडी

ढाणकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी दत्तदिगंबर वानखेडे; नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने ठरला विजय.

ढाणकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी दत्तदिगंबर वानखेडे; नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने ठरला विजय.

मिलिंद चिकटे

ढाणकी प्रतिनिधी: येथील नगरपंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक सर्वसाधारण सभेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे दत्तदिगंबर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षांनी आपल्या ‘निर्णायक मताचा’वापर केल्याने वानखेडे यांचा विजय सुकर झाला.

मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या उपस्थितीत आणि नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीकडून दत्तदिगंबर वानखेडे आणि भाजपकडून उमेश योगेवार यांनी अर्ज दाखल केले होते. मतदानादरम्यान दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ९-९ मते पडल्याने सभागृहात पेच निर्माण झाला. यावेळी नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांनी सदस्य म्हणून मतदान केल्यानंतर, मते समसमान झाल्याने आपले ‘निर्णायक मत’ वानखेडे यांना दिले आणि त्यांची निवड जाहीर केली.

नगराध्यक्षांच्या दुहेरी मतदानावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी २६ डिसेंबरच्या सरकारी अध्यादेशाचे वाचन करून स्पष्ट केले की, नगराध्यक्षांना सदस्य म्हणून मतदान करण्याचा आणि समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या स्पष्टीकरणानंतर वानखेडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

उपनगराध्यक्ष निवडीसोबतच रिक्त असलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांची प्रक्रियाही पूर्ण झाली. यामध्ये भाजपकडून रोहित वर्मा आणि शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष संजय सालेवाड यांची नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही नेत्यांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांची निवड झाल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली.

 

सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार: अर्चना वासमवार.

 

निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. “शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. कोणतीही गटतट न पाहता सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन ढाणकी नगरीचा सर्वांगीण विकास साधणार,” असा विश्वास नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांनी व्यक्त केला.

 

यावेळी नगरपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *