उमरखेड आगाराचा गलथान कारभार, भंगार एसटीने प्रवाशांचा जीव धोक्यात
ढाणकी प्रतिनिधी , मिलिंद चिकटे
उमरखेड आगाराच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ही घटना उमरखेड आगाराच्या बसच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. एसटी क्रमांक एम एच 40 एन 8950 ही बस ढाणकीहून उमरखेडकडे जात असताना अचानक तिचा स्टेरिंग रॉड तुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे उमरखेड आगाराच्या बसची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
एकीकडे उमरखेड आगाराकडे जुन्या आणि भंगार बस असताना, नुकत्याच मिळालेल्या चार नवीन बस यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यांना वितरित करण्यात आल्याचे प्रवाशाकडून बोलल्या जात आहे. यावरून उमरखेड विधानसभा आमदार किसन वानखेडे व इतर राजकारण्यांकडून योग्य पाठपुरावा होत नसल्याचे दिसते. यामुळे नागरिकांना जुन्या आणि धोकादायक बसमधून प्रवास करण्यास भाग पाडले जात आहे.
या घटनेमुळे उमरखेड आगाराच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड आगार प्रमुखांच्या डोक्यावर बड्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे असा आरोप प्रवासी करत आहे यावर योग्य ती कारवाई न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.



