ढाणकीचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करणारे नेते गायब.हे आहेत, ढाणकीचे मुख्य रस्ते
ढाणकी /प्रतिनिधी :*मिलिंद चिकाटे.
अनेक समस्यांनी समस्याग्रस्त असलेले बिचारे ढाणकी शहर म्हणावे लागेल. बंदी भागातील नागरिकांसाठी पंचक्रोशीतील सर्वात मोठी व्यापार पेठ तथा लोकसंख्येने जवळपास ३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेले तालुका लेव्हल चे शहर. इथली पाणी समस्या जिल्ह्यात कुप्रसिद्ध. भर पावसाळ्यात ४० दिवसाआड नळाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून, दीडशे रुपयांत पाचशे लिटर पाण्याची न परवडणारी टाकी, सामान्य नागरिकांना नाईलाजास्तव विकत घ्यावी लागते. या काळात नगरपंचायत चे नियोजन तर अफलातून असते. अख्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी, तब्बल दोन टँकर असतात. विशेष म्हणजे पाण्यासाठी दोन्हीही टँकरवर नागरिकांची पडणारी उडी व होणारी भांडणं, याचं काही घेणं देणं नगरपंचायतला नसतं. इथे मुख्य व्यापारपेठेत मुत्रीघरचं नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हे सुद्धा नित्याचेच.एवढ्या मोठ्या गावची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशनच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची भलीमोठी इमारत परंतु कुत्रा चावल्यास रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नाही. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची सुविधा नाही.शहरातील भलीमोठी व जुनी जिल्हा परिषदेची शाळा शेवटची घटका मोजतेय. इथे झालेला भला मोठा सौर ऊर्जेचा प्लांट अर्ध्यातूनच बंद पडला. शहरात सर्वत्र घाणच घाण, घनकचरा व्यवस्थापन नाही. आणि शहरात जाणारे मुख्य रस्ते निव्वळ चिखलमय.
ढाणकी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन पाच वर्षाचा कार्यकाळ लोटला. नगरपंचायत ची दुसरी निवडणूक जवळ आली. पहिल्या नगरपंचायतच्या निवडणूक रणधुमाळीत, शहरात बाहेरुन येऊन भल्या मोठ्या नेत्यांनी मोठमोठी भाषणे दिली, पाच वर्षात ढाणकीचा चेहरा मोहरा बदलू. ढाणकीचा सामान्य नागरिक आता त्या नेत्यांची ढाणकीत येण्याची वाट पाहत आहेत.कारण शहराचा चेहरा मोहरा तर सोडाच, गेल्या पाच वर्षात एकही विकासात्मक काम शहरात झालं नाही. जी काही थोडीफार कामे झाली असतील त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, सामान्य नागरिक आता या प्रस्थापित नेत्यांना कंटाळला असून , काम करण्याची नियत नसलेले, प्रस्थापित आत्तापर्यंत अनुभवलेले सर्वच नेते मंडळी चा चेहरा मोहरा, ढाणकीकरांना कळाला असल्याचे नागरिक बोलून दाखवताना दिसत आहेत.
ढाणकीची नगरपंचायत झाली शहराचा विकास तर नाहीच झाला, परंतु सामान्य नागरिकांवर कराचा बोजा मात्र वाढला. आगामी नगरपंचायत निवडणूकीत प्रस्थापित सर्वच राजकीय लोकांना डावलून, नवयुवक, काम करण्याची नियत असलेले, शहराच्या विकासाचे विश्वासात्मक व्हिजन घेऊन येणाऱ्या, युवा तरुणांच्या हाती, शहराची बागडोर देण्याचे, ढाणकीकरांनी ठरवले असल्याचे, शहरातील सामान्य नागरिक सुतोवाच करतांना दिसून येत आहेत.




