ताज्या घडामोडी

श्री रेणुका देवी संस्थान – पुरातन भिंत कोसळल्याची घटना,, परंतु अनेक प्रश्न अनुत्तरित

श्री रेणुका देवी संस्थान – पुरातन भिंत कोसळल्याची घटना,, परंतु अनेक प्रश्न अनुत्तरित

 

श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड

 

श्री रेणुका देवी मंदिरालगतची पुरातन भिंत गुरुवारी दुपारी १ वाजता कोसळली, त्यानंतर सुमारे ३ वाजता भिंतीचा उरलेला अर्धवट भागही खाली कोसळला. ही घटना मंदिर परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात असून, यामध्ये अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

 

भाविकांनी दिलेल्या भेटवस्तूंचे नुकसान घटनास्थळी पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली भाविकांनी मंदिराला अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तू दबून गेल्याचे आढळून आले. त्यामध्ये महागडी धातूची पितळी समई, घंट्या, LCD टीव्ही, शोभेच्या वाघाचे कातडे, महावस्त्र आणि इतर अनेक पूजावस्तूंचा समावेश होता. काही वस्तूंना झाकण्यासाठी घटनास्थळी टिनपत्रे टाकून ठेवण्यात आल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे नुकसान लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही होत आहे.

 

संस्थानचे प्रभारी व्यवस्थापक यांनी नुकसानीबाबतची अधिकृत माहिती देण्यास सध्या असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे एकूण नुकसानीचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, घटनास्थळी पाहणी केलेल्या माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महत्त्वाच्या वस्तूंना नुकसान पोहोचले आहे. नुकसान झाकण्याच्या प्रयत्नामुळे पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत आहेत.

 

मनुष्यहानी टळली, पण धोका कायम भिंत कोसळण्याची घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच्याच काही अंतरावर संस्थानचे महिला व पुरुष कर्मचारी जेवण करत होते. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे.

 

लिफ्ट्स व स्कायवॉक प्रकल्पाची दिरंगाई कारणीभूत या घटनेला लिफ्ट्ससह स्कायवॉक प्रकल्पाच्या दिरंगाईचे दुष्परिणाम कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. श्री रेणुका देवी मंदिरात दिव्यांग आणि वयोवृद्ध भाविकांना सोयीस्कर दर्शन मिळावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प मंजूर झाला होता. दिड वर्षाचा कालावधी देऊन काम सुरु करण्यात आले, परंतु अद्याप केवळ ३०% कामच पूर्ण झाले आहे.

 

कामाची गती अत्यंत संथ असून, मंदिरालगत केलेले खोदकाम आणि वेळेवर संरक्षक उपाय न केल्यामुळेच ही भिंत कोसळली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या प्रयत्नांना काम करणाऱ्या खाजगी कंपनीची पुरेशी साथ मिळेल का?यात मात्र शंका आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *