35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकी शहरात मुत्री घरच नाही
ब्युरो रिपोर्ट/अजिज खान
स्वच्छ भारत,सुंदर भारत, स्वच्छ शहर, सुंदर शहर हे जरी सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी नगरपंचायत ढाणकीच्या वतीने ते केवळ कागदोपत्रीच राहिलेले दिसून येत आहे. शहरात जुने बस स्टॉप असो की आठवडी बाजार या परिसरात नगरपंचायत चे सार्वजनिक शौचालय नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. व्यापारी असो की नागरिक प्रत्येकांना लघुशंकेसाठी भटकावे लागत असल्याने नगरपाचायात प्रशासनाप्रती संताप व्यक्त होत आहे.माय माऊलीस लघू शंका आल्यास विलाजच नाही. माय माउली खरेदीसाठी शहरात जायला घराबाहेर पडली की आधी “तीला” काळजी घ्यावी लागते. कारण शहरात कुठेही तिच्यासाठी लघुशंकेसाठी व्यवस्था नाही… पुढे चार- पाच तास तिला ” लघूशंका रोखून धरावी लागते. यामुळे शहरातील अनेक महिलांना इन्फेक्शन, पोटात दुखणे, किडनी स्टोनसारखे आजार जडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जरी सत्य असेल तरी सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेली नगरपंचायत मात्र यात कुचकामी ठरत आहे. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत नगर पंचायत उदासिन असल्याचे चित्र दिसून येत आहे.