पोटा बु.येथील देशी दारू दुकानचालकासह ६ जणांना बनावट दारू प्रकरणी घेतले ताब्यात; १ फरार.
हिमायतनगर| कृष्णा राठोड
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे पोटा बु. येथील परवाना धारक देशी दारूच्या दुकानातून बनावट दारूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून उत्पादन शुल्क विभाग नांदेड येथील अधिकाऱ्याच्या टीमने काल रात्रीपासून सापळा रचून दारू दुकानचालक अण्णांसह सहा जणांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे. या घटनेचा पंचनामा सुरु असून, त्यापैकी मुख्य २ आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे अवैद्य आणि बनावट दारू विक्रेत्यात खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने या प्रकाराची कसून चौकशी करावी आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील खडकी बा., विरसनी, जवळगाव, कामारवाडी, कामारी, दुधड, पवना, कांडली, पारवा, कार्ला, सवना, वाशी, सरसम बु., मंगरूळ आदींसह इतर भागात अश्या प्रकारची बनावट दारू विक्री केली जाते का..? याची चौकशी करावी. आणि कोण कोण..? या धंद्यात सामील आहे त्यांना गजाआड करावे अशी मागणी व्यसनमुक्तीचे प्रचारक व नागरीकातून केली जात आहे.
हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात परवानाधारक देशी दारूची ८ ते १० दुकाने आहेत, त्यापैकी काहीजण दुकानां व्यतिरिक्त इतर ठिकाणी दारूचा पुरवठा काही युवकांच्या माध्यमातून जीप, दुचाकीवरून करून दारूचा अवैद्य धंदा जोमात चालवीत आहेत. त्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. परिसरात असलेल्या परवानाधारक दारू विक्रेत्याकडून निवडणूक, यात्रा महोत्सव काळात मोठ्या प्रमाणात दारू सप्लाय केली जाते. एवढंच नाहीतर ग्रामीण परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने दारूचा पुरवठा पार्सलच्या माध्यमातून करून अवैद्य व्यवसाय चालविला जात आहे. या दुकानदाराकडून यापेक्षाही नवी शक्कल लढवून अल्पावधीत मालामाल होण्यासाठी तेलंगणा राज्यातून देशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये तयार केलेली बनावट दारू भरून महाराष्ट्रात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु.या ठिकाणी आणून देशी दारू दुकानातून विक्री केली जात असल्याचे नागरीकातून सांगण्यात येत आहे. याची चर्चा मागील काळात अनेकदा झाली, मात्र याबाबतची कोणतीही ठोस कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाने केली नव्हती.
मागील महिन्यात पोटा येथील परवानाधारक दारू दुकान असलेल्या तुळसाबाई मारोती हटकर व त्यांचे भागीदार यांच्याकडे दारू दुकानावर दारूची बॉटल घेण्यासाठी एक ग्राहक आला होता. त्या व्यक्तीने दारूची बॉटल खरेदी करून तिथेच ढोसली. मात्र दारूच्या चवीत फरक जाणवल्याने आणि कडवट पणा येत असल्याने लागलीच त्याने दारूची बॉटल दारू दुकानाच्या काउंटरवर फोडून दुकानदारास खडे बोल सुनावले. यावेळी दुकानदाराने इतरत्र याचा प्रसार होऊ नये म्हणून त्या ग्राहकास दुसरी म्हणजे ओरिजनल देशी दारूची बॉटल देऊन तेथून काढून दिले. त्यानंतर याची चर्चा बरीच झाली मात्र कोणीही बनावट दारूची तक्रार केली नाही. याची माहिती उत्पादन शुल्क विभाग नांदेडच्या अधिकाऱ्याना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकास या प्रकारची कुणकुण लागली. मात्र ते बनावट दारू रंगेहात पकडण्याची संधी मिळण्याच्या शोधात होते. दरम्यान दि.१० च्या रात्रीला येथे तेलंगणा राज्यातून बनावट देशी दारू आणली जाणार असल्याची माहिती मिळाल्याने हिमायनगर तालुक्यातील पोटा बु. येथील परवानाधारक दुकानदारासह त्याच्याकडे ये-जा करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली.
यासाठी तेलंगणाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या विविध दोन रस्त्यावर दोन पथके तैनात ठेऊन मुख्य आरोपीसह सहा जणांना दि.११ रोजी सकाळच्या रामप्रहरी ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीसाठी पथकाच्या लोकांना रात्रभर मेहनत घ्यावी लागली. परंत्तू त्यापैकी एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्या सर्वाना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारूसह ताब्यात घेऊन पोटा बु. येथील दुकानचालक मुख्य आरोपीची चौकशी केली. या सर्वाना हिमायतनगर येथील विश्राम गृहाच्या इमारतीत आणून त्यांच्याकडून मिळालेला दारूचा माल जप्त केलं आहे. हि कार्यवाही होताच याची खबर शहर व ग्रामीण भागात वाऱ्यासारखी पसरली. पंचनामा व कार्यवाहीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यांनतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य दोन आरोपीना हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात सायंकाळी ४ वाजता हजर केले होते. तर 4 जणांना सोडण्यात असल्याचे समजले. पत्रकारांनी अनेकदा या कार्यवाही बाबतची प्रेसनोट मागितली, यावेळी पथकांच्या एका कर्मचाऱ्याने सहा जण व बनावट दारूसह ताब्यात घेतले, एक फरार झाला आहे, असे मोघम सांगितले. वृत्त लिहीपर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र लेखी स्वरूपात माहिती, प्रेस नोट पत्रकारांना देण्यात आली नव्हती.