ताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्या : खासदार हेमंत पाटील यांची मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे मागणी

 

 

नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे 

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या महिना भरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे . 

गेल्या महिना भरापासून हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, उमरखेड व महागाव या अकराही तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीपाच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अतिवृष्टीमुळे नद्या ओंढ्यांना पूर येऊन जमिनीही खरडून गेल्या आहेत. या आसमानी संकटामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, केंद्रा खुर्द, माहेरखेड, हिवरा, कडोळी या गावांना भेटी दिल्या व अनेक ठिकाणी थेट बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भैय्या पाटील गोरेगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, हिंगोली शिवसेना तालुकाप्रमुख भानुदास जाधव, सवना सर्कल प्रमुख बी आर नायक, नामदेव हागे, धनाजी गीते, दिलीप कुंदर्गे, केंद्रा खुर्द शाखा प्रमुख गंभीरराव देशमुख, पोलीस पाटील प्रकाश गोडघासे, गजानन गवळी, प्रल्हाद जाधव, विनायकराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे असे निर्देश जिल्हा प्रशासन व महसूल प्रशासनाला दिले आहेत .

निसर्गाच्या लहरीपणामुळे व परतीच्या पावसाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या जात आहे.

 

मागील सतत दोन वर्षाच्या काळात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे . त्यातच मागील महिना भरापासून सुरु असलेल्या पावसाने थैमान घातले असून यामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात घुसून जमिनीचे सुद्धा नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.

नदी नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे पुल तसेच रस्ते वाहून गेले आहेत. पुराच्या पाण्यात नागरिक व गुरे ढोरे वाहून जाऊन जिवित तसेच मालमत्तेची हानी होण्याचे प्रकारही वाढले आहेत.

 

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

यापूर्वीच खा. हेमंत पाटील यांनी हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत निर्देशित केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *