अर्धापूर, दि.७ (खतीब अब्दुल सोहेल) तालुक्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव आणि सांगवी या गावचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला असून तालुक्यातील सर्वच छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नदी व नाल्या काठच्या जमिनी पिकासह खरडून गेल्या आहेत. तालुक्यातील शेलगाव लहान, लोणी, मेंढला, सांगवी-खडकी, बामणी, उमरी आदी गावसह विविध गावात शेकडो हेक्टर सोयाबीन, हळद व केळीचे पीक पाण्याखाली गेले आहे. तर मेंढला नाल्याला पूर आल्यामुळे शेलगावात पाणी शिरले होते. तसेच मुख्य रस्त्यापासू गावचा संपर्क तुटला होता. तर सांगवी गावात जाणाऱ्या पुलावरील पाणी जाऊ लागल्यामुळे या संपर्क तुटला होता. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सुजित नरहरे यांच्यासह तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट दिल्या.यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली.
लहान ते चाभरा या राज्य महामार्गाचे काम सुरू असून लहान परिसरात पुलाचेही काम पूर्ण झाले होते. पूल वाहतूकीसाठी खुला होऊनही संबंधित कन्ट्रक्शनने सदरील पुलाखालील पाणी अडवण्यासाठी केलेला मातीचा बांध मात्र तसाच ठेवला. गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड पाणी तुंबले. यात लहान येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. सोयाबीन व हळद या पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी खरडून गेली.तसेच शेतातील रासायनिक खतांच्या बॅगाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.