महागाव तालुक्यातील रात्रीच्या अंधारात मुरूम आणि विभट्या मातीचे अवैध उत्खनन जोरात महसूल विभागाचे दुर्लक्ष?
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: गोपाल एच राठोड.
महागाव तालुक्यातील मौ. साई (ई)गावातील अनेक वीटभट्टी असून सध्या अवैध उत्खननाचा गोरखधंदा तेजीत असून, रात्रीच्या वेळी ‘विभट्या’ माती आणि ‘मुरूम’ यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्यामुळे रात्रीच्या शांततेत ट्रॅक्टरचा खडखडाट आणि खणन सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.साई (ई)परिसरात काही भूमाफियांनी अधिकृत परवानगी न घेता उत्खनन मागील २ महिन्या पासून सतत सुरू केले आहे.दिवसा कारवाया होण्याच्या भीतीने या माफियांनी आता रात्रीची वेळ निवडली आहे. रात्री १० वाजेनंतर ते पहाटेपर्यंत जेसीबी आणि डझनाहून अधिक ट्रॅक्टरच्या साहाय्याने तळ्यातील व काही टेकड्या आणि जमिनी पोखरल्या जात आहेत. यामध्ये विशेषतः बांधकामासाठी उपयुक्त असलेला मुरूम आणि विभट्या मातीचे उत्खनन करून ती चढ्या दराने विकली जात आहे.पर्यावरणाचे नुकसान आणि रस्त्यांची दुरवस्था
या अवैध उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक समतोल बिघडत असून जमिनीची धूप होत आहे. तसेच, ओव्हरलोड भरलेल्या ट्रॅक्टरमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची पार चाळण झाली आहे. रात्रीच्या वेळी वेगाने चालणाऱ्या या ट्रॅक्टरमुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास होत आहेत.रात्रभर ट्रॅक्टरच्या आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. वारंवार तक्रार करूनही महसूल विभाग किंवा पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून सुरू असलेल्या या तस्करीवर तहसीलदार आणि गौण खनिज विभाग कधी कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणण्यासाठी धडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.




