नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट!
ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे
ढाणकी: ढाणकी शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीची घंटागाडी (कचरा गाडी) बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायतीच्या या उदासीन धोरणामुळे शहरात जागोजाग कचऱ्याचे ढिग साचले असून ‘स्वच्छ शहर’ ही ओळख पुसली जाऊन ‘अस्वच्छ शहर’ अशी अवस्था झाली आहे. नगरपंचायतीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे उकिरडे तयार झाले आहेत.
या गंभीर समस्येकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्याने ढाणकीचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, नगरपंचायतीच्या या अनास्थेमुळे निर्माण झालेल्या समस्येवर शहरातील काही तरुणांनी पुढाकार घेत स्वतः कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावली आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे बुद्धभूषण पाईकराव, रामराव गायकवाड, स्वप्नील चिकाटे , अक्षय भगत डॉ आंबेडकर पुतळ्या परिसरातील या युवकांनी कचरा साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. त्याचप्रमाणे महावीर टॉकीज परिसरामध्ये शेख एजाज , शेख इनायत यांच्यासह इतर युवकांनीही हीच भूमिका घेत कचरा साफसफाईचा उपक्रम राबवला.
नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, तरुणांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी आणि तरुणांनी मागणी केली आहे की, नगरपंचायतीने तातडीने कचरा गाडी सेवा सुरू करून ढाणकी शहराला आरोग्य संकटातून बाहेर काढावे.




