उमरखेड / लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपाली दवणे काळबांडे यांची यशाला गवसणी.
उमरखेड तालुका प्रतिनिधी:-
मिलिंद चिकाटे.
असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे”. संत तुकाराम महाराजांच्या ह्या ओळी खऱ्या करून दाखविल्या दिपाली दवने काळबांडे यांनी!अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांची गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत बिड जिल्हा येथे जलसंपदा विभागात सरळ सेवेतून कालवा निरीक्षक पदी नियुक्ती झालेली आहे.
दिपाली दवणे ह्या उमरखेड तालुक्यातील करंजी ह्या खेडे गावातील मुलगी.लग्नानंतर सावळेश्वर नंतर मुंबई विरार येथे स्थायिक झाल्या.शिक्षणाची प्रचंड आवड असल्यामुळे त्या गृहस्थ जीवनात असताना त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.विशेषतः लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केले.मुलगा अकरावीत असताना स्वतःचा संसार सांभाळून त्यांनी अभ्यासात आपले सातत्य ठेवले.त्यात त्यांना ज्योतिबा-सावित्री प्रमाणे पतीची साथ मिळाली.करंजी ची लेक आणि सावळेश्र्वर च्या ह्या कर्तृत्ववान सुनेने अभ्यासाच्या जोरावर उंच भरारी घेत तालुक्याचे,दोन्ही कुटुंबाचे नाव लौकीक केले.ह्या यशाचे श्रेय त्यांनी महापुरुषांनी उपलब्ध करून दिलेल्या हक्क अधिकारांना तथा कुटुंबीयांना दिले.विपरित परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत असून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वांसाठी त्यांनी आदर्श घालून दिला आहे.