महागांव /पत्नीच्या हातात सत्तेची दोरी पती झाला कारभारी प्रशासन पदाधिकाऱ्यांवर मेहेरबान | गावकऱ्यांचे पं.स. कार्यालयासमोर उपोषण
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
महागांव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राहुर येथील ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराची दलदल फोफावली आहे. कागदोपत्री विकास कामे दाखवून शासनाचा निधी हडप करण्याचे कारनामे सरपंच, उपसरपंच आणि सचिवाने केले असा आरोप करीत गावकऱ्यांनी महागाव पंचायत कार्यालयासमोर समिती आज
सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिवाच्या संगणमताने गावाचा खेळखंडोबा करण्यात येत असून, या भ्रष्टाचाराला महागाव पंचायत समिती प्रशासनाचे संपूर्ण पाठबळ असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते दिलीप गोविंद जाधव यांनी केला आहे. दिलीप जाधव हे स्वतः राहुर ग्रामपंचायतीत सदस्य असून, त्यांनी ग्रामपंचायत मधील अनियमित्ता चव्हाट्यावर आणल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. सरपंच, उपसरपंच आणि सचिवाने मिलीभगत करून गृहकर वसुली आणि पाणी कर वसुलीच्या रकमेत मोठा गोलमाल केला. पाणी कराचे ८७ हजार २८० रु. आणि गृहकराचे ४८ हजार ७३५ रुपये परस्पर हडप करण्यात आले असा गावकऱ्यांचा आरोप आहे. याशिवाय कोणतेही विकास काम न करता चेक द्वारे १९ हजार ७०० रुपयांची उचल करून ही रक्कम हडप करण्यात आली. ग्रा.प. सदस्य दिलीप जाधव यांनी पाठपुरावा करून या रकमेचा हिशोब मागितला, परंतु त्यांना कोणताही हिशोब देण्यात आलेला नाही. राहूर ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगामधील सिमेंट रस्ता गावकऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आला. गावातील विकास कामे मनमानी करून कुठेही प्रस्तावित करणे, गावातील घरकुलांची नोटरी, घरांचा फेरफार आणि नमुना ८ कुणाच्याही नावाने करून देत पैसा उकळण्याचे कारनामे करण्यात येत आहेत. विकास कामाच्या साहित्यासाठी पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आलेली जीएसटीची बिले माहितीच्या अधिकारात ग्रा.प. सदस्य दिलीप जाधव यांना देण्यात आली नाही. लोखंडी कचराकुंड्या मागील एक वर्षापासून सडत असून गावात त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. पंधराव्या वित्त आयोगामधून गावात सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आला परंतु, याबाबतचा ठराव मासिक बैठकीत चर्चेलाच आलाच नाही. या विकास कामाचे कोणतेही टेंडर सुद्धा काढण्यात आले नाही. सर्व प्रक्रिया मॅनेज करून निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला व यात लाखो
रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. वॉर्ड ३ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले नाही. संबंधित पेव्हर ब्लॉक अतिक्रमणात बसविण्यात आले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेतून पथदिव्याची कामे दलित वस्तीमध्ये करावयाची होती, परंतु ही कामे भलत्याच ठिकाणी करण्यात आली. उपसरपंच यांच्या घरासमोर पथदिवे लावण्यात आले. राहुर ग्रामपंचायत अंतर्गत शासनाची व भूदान यज्ञ मंडळाची जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांना शासनाची अनुमती न घेता बोगस मालकी पट्टे देण्यात आले व मनमानी पद्धतीने गाव नमुना ८ देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि ग्रामपंचायतचे रेकॉर्ड पंचायत समिती कार्यालयात जमा करून गावात भ्रष्टाचार करणारे पदाधिकारी व सचिवावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रा.प. सदस्य दिलीप जाधव, ग्रा.प. सदस्य सीमा नेवरे, ग्रा.प. सदस्य शेख शबाना शेख अमीर, टिपू शेख, काशीराम गुलाब जाधव, शेख जावेद शेख अमीर, महादेव मोहिते आणि इतर ग्रामस्थ आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. ( प्रती )