यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक,
यवतमाळ रिपोर्टर,एस.के शब्बीर
( शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळखट्याक चा इशारा)
यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खुप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत. वेळ पडल्यास शेतकरी बांधवांवर दुबार पेरणी करावी लागू शकते. अशा परिस्थितीत आपला पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्याच काही कृषी केंद्र दुकानदारांकडून लुबाडल्या जाण्याची दाट शक्यता आहे. काही कृषी केंद्र चालक बियाण्यांचा तुटवडा भासवत आहे, तसेच एजंटचा सुळसुळाट, बियाण्यांचा काळाबाजार, दुकानदारांची लिंकिंग साठी जबरदस्ती यासह सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या जीवन मरणाच्या विषयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने थेट कृषी केंद्र विक्रेतांच्या जिल्हा कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक त्वरित थांबा अन्यथा मनसेची गाठ आहे असा सज्जड इशारा मनसेचे अनिल हमदापुरे, दिग्रस विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, यवतमाळ विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहमान, तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने कृषी केंद्र संचालकांना दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात कृषी केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना त्यांना हवे असलेले बियाणे उपलब्ध असतांना सुद्धा त्यांना सदर कंपनीचे बियाणे संपले असुन इतर कंपनीचे बियाणे तुम्ही वापरा अश्या प्रकारची जबरदस्ती करीत आहे. वास्तविकतेत मात्र त्यांच्याकडे त्या कंपनीचा माल असतांना सुद्धा ते ग्राहकांना कमी दर्जाचे बियाणे देऊन एक प्रकारे त्यांची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे काही दुकानदार आपल्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना काळ्या बाजारात उपलब्ध करून देत आहे. सोबतच शेतकरी बांधवांना खत खरेदी करतांना मोठ्या प्रमाणात लिंकीक म्हणजेच खतांसोबत पीडीएम पोटॅश, मायक्रो न्यूटून प्रोडक्ट घेण्यासाठी आग्रह होत आहे. अगोदरच आसमानी, सुलतानी व सावकारी पाशामध्ये अडकलेला शेतकऱ्याची कृषी केंद्र दुकानदारांकडून अशा प्रकारची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप याप्रसंगी अनिल हमदापुरे यांनी केला.
वास्तविकतेत आपल्या शेतजमीनीत पिकांसाठी आवश्यक असलेले १६ घटक असतांना सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढविल्या जात आहे. अशा कुठल्याच प्रकारचे शासन निर्णय नसतांना कुठल्याही ग्राहकाला करण्यात येणारी लिंकीकची जबरदस्ती हा एक प्रकारचा ग्राहक हक्कानुसार गुन्हाच होय. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नामांकीत कंपनीचे बियाणे ज्यादा दरात विक्री करण्याच्या तक्रारी मनसेला प्राप्त झालेल्या आहेत. मनसेच्यावतीने सर्व चिल्लर व ठोक कृषी केंद्र चालकांना मागणी करण्यात येते की, त्यांच्याकडील बियाणे व खतांची आवक जावक दुकानाच्या दर्शनीय भागात लावावी जेणेकरून शेतकऱ्यांना संबधीत दुकानदाराकडे काय उपलब्ध आहे याची माहिती मिळेल व काळ्या बाजाराला कुठेतरी लगाम लागून शेतकरी व दुकानदार यांच्यातील पारदर्शकर्ता वाढेल. याप्रसंगी विकास पवार यांनी नेर येथील घटनेचा उल्लेख करत पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडल्यास मनसेच्या पद्धतीने बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा दिला.हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असुन या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने विनंती वजा इशारा देण्यात आला.
वरिल पैकी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी मनसेला जिल्ह्यातील कोणत्याही दुकानदाराबाबत प्राप्त झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने संबंधीत दुकानदाराचा समाचार घेऊन त्याचा परवाना रद्द करण्यासाठी वेळ प्रसंगी खळखट्याकची भूमिका घेऊन रत्यावर उतरेल. जो काही प्रकार घडेल त्याला सर्वस्वी संबंधीत दुकानदार जबाबदार राहील.महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहिली असुन शेतकरी बांधवांसोबत असले प्रकार जर जिल्ह्यात घडत असतील तर चुकीला माफी नाही सोबतच जिल्ह्यातील संबंधित कृषी केंद्र विरोधात त्याचा परवाना रद्द होईपर्यंत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मनसे घेईल. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे अनिल हमदापुरे, विकास पवार जिल्हा उपाध्यक्ष मनसे,साजीद अब्दूल रहेमान जिल्हा उपाध्यक्ष मनसे गजानन पोटे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष, यवतमाळ., लकी छांगाणी, गोपाल घोडमारे, आशिष सरुळकर, सौरभ अनसिंगकर यासह मनसेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.