अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत.
मुख्यसंपादक : एस.के.चांद यांची बातमी
नांदेड दि. 4 -उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित असे अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील मातंग, दलित, आदिवासी अशा बहुजन समाजाच्या वतीने भेट घेऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला व नांदेड जिल्ह्यातील त्यांची पुढील कारकीर्द वैशिष्ट्यपूर्णरित्या यशस्वी ठरो, यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा ग्रामीण विकास हा जो अभ्यासाचा व चिंतनाचा विषय आहे, त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून राहणार्या दलित, आदिवासी आदी समाजाच्या खालील जिव्हाळ्याच्या प्रश्नांविषयी चर्चा करून, तशा आशयाचे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकांना नवीन वस्तीवाढ, स्मशानभूमी, गायरानधारकांचे पट्टे, दलितवस्ती योजना, मागासवर्गीयांसाठी घरकूल योजना, दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजना, विविध मागासवर्गीय महामंडळाचे बँकेकडे पाठवलेली कर्ज प्रकरणे, दलित वस्तीतील पाणी पुरवठा योजना, कृषी विभागाच्या योजना आदी मुलभूत प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातून दलित, मातंग समाजावर होणारे सामाजिक अन्याय-अत्याचार, खून, बलात्कार यासारख्या अमानवीय घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा गंभीर गुन्ह्याकडे व अन्याय-अत्याचाराकडे पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. सदरील गुन्ह्यांना गांभीर्याने घेत नसून उलटपक्षी अॅट्रासिटी अॅक्ट फिर्यादीच्या विरोधात कलम 395 अन्वये दरोड्यासारखे खोटे गुन्हे पोलीस सर्रासपणे नोंदवून आरोपींना एकप्रकारे संरक्षण देत पाठीशी घालत आहेत. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, सिटूचे कॉ. गंगाधर गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलनाचे माणिक कांबळे, क्रांती आंदोलनाचे पिराजी गाडेकर, शिवाजी नुरूंदे, नागेश तादलापूरकर, शशिकांत तादलापूरकर, गजानन खुणे, रमेश गायकवाड, कॉ. बालाजी भोसले, कॉ. गंगाधर खुणे, सुरेश गायकवाड, काशिनाथ कांबळे, सोनबा कांबळे ढाकणीकर आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.