शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे -राजश्री पाटील
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
नांदेड : आपल्या भागात उत्पादीत होणाऱ्या मालाची योग्य ती माहिती घेऊन आणि बाजारपेठेत त्या मालाला असलेली मागणी लक्षात घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून काम केल्यास नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी शेतकरी उत्पादक कंपनी करिता आयोजित केलेल्या कार्यशाळेत अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.
खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशन व तुकाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळेचे आयोजन गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे करण्यात आले होते .या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सनदी लेखापाल आर्थिक सल्लागार तथा व्यवसाय प्रशिक्षक मयूर मंत्री यांच्यासह गोदावरी अर्बनच्या उपाध्यक्ष हेमलता देसले,सचिव ऍड. रविंद्र रगटे, प्रा. सुरेश कटकमवार तुकाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक अजय देशमुख सरसमकर,सदाशिव पुंड, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राजश्री पाटील म्हणाल्या कि, सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे त्यामुळे कोणत्याहि क्षेत्रात तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर स्वतः मधील सकारात्मक दृष्टीकोन जिवंत ठेवून तुमचं स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करावी लागेल त्याकरिता प्रचंड मेहनत , काम करण्याची तयारी , आणि एकमेकांना सहकार्याची भावना मनात असायला हवी. सध्या शेती करण्याची पद्धती बदलली आहे हायटेक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो, त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना खूप मोठा वाव आहे.काळाची पावले ओळखत आणि आपल्या भागात उत्पादित होणाऱ्या मालाची बाजारपेठेतील पत ओळखून व्यवसायाला सुरवात करा नक्कीच यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तसेच उत्पादित मालावर निव्वळ खरेदी विक्री न करता स्वतः चा ब्रँड तयार करून विक्री केल्यास उत्पन्न जास्त मिळण्याची शक्यता आहे . असेही राजश्री पाटील म्हणाल्या .
प्रमुख मार्गदर्शक सनदी लेखापाल मयूर मंत्री यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यापासून ते प्रत्यक्ष उत्पादन निर्यात करण्याच्या प्रक्रियेतील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली.कंपनी पुढे घेऊन जाण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते आणि त्याचा उपयोग आपण कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. त्याकरिता कंपन्यांनी आपल्या भागात जो माल उत्पादित होतो त्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे . नवनवीन बियाणे, वाण याची लागवड करून भरघोस उत्पन्न कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे सोबतच उत्पादन आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीची पूर्तता केली पाहिजे.शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल आणि उत्पादनात वेगळेपण आणावे लागेल तरच आपण जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेत पुढे यशस्वी झेप घेऊ कंपनी सातत्याने पुढे नेण्यासाठी गुणवत्ता, मार्केटिंग, आधुनिक तंत्रज्ञान यांचा त्रिवेणी संगम करावा लागेल
कार्यशाळेला हिंगोली,नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढगे अग्रिक्रॉस , वनश्री , उत्तरेश्वर , त्रिदत्त , मीनय , कुरुंदकर , प्रज्ञा शील करुणा, हिंगोली अर्बन ,वनप्रयाग , किसान दिशा , गजानन साई, दत्तगुरु, बाराशीव हनुमान , सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संदिप बोरगेमवार गोदावरी फाऊंडेशनचे विलास वाळकीकर, संकेत कदम, जसवंत सिंग, यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.