लोकार्पण सोहळ्यात उठली विकासाची मागणी; ढाणकीला मिळाली तीन नवीन पोलीस वाहने
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी पोलीस चौकी येथे आज तीन नवीन अत्याधुनिक पोलीस वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या केवळ शासकीय सोहळ्याचे स्वरूप न राहता, स्थानिक प्रलंबित प्रश्नांवरून या प्रसंगी विकासाची जोरदार मागणी करण्यात आली.आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते या वाहनांचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन भूतडा यांची उपस्थिती होती. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, बाळू पाटील चंद्रे, खाजा भाई कुरेशी, रोहित वर्मा, सूर्यकांत वासमवार, बाळा भाऊ योगेवार, गजानन मिटकरे, रमेश गायकवाड, महेश पिंपरवार, परमेश्वर निमलवाड, अनिल गंगरपाड, पंकज केशेवाड, मल्हार चंद्रे, नागेश रातोळे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. बाळू पाटील चंद्रे यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतानाच काही गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की: ढाणकीजवळील नाल्याला थोड्या पावसातही पूर येतो. यामुळे वाहने सोडाच, पायी चालणेही अशक्य होते आणि ‘बंदी’ भागातील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. बिटरगाव येथील पोलीस वसाहत इंग्रजकालीन असून ती अत्यंत जीर्ण झाली आहे. तिथे नवीन वसाहत निर्माण करणे काळाची गरज आहे.नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आमदार किसनराव वानखेडे यांनी जाहीर केले की, ढाणकीजवळील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच, पोलीस वसाहतीचा प्रश्नही तातडीने मार्गी लावून नवीन वसाहत मंजूर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविकात ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, बिटरगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असून त्यात अनेक दुर्गम गावांचा समावेश आहे. अशा वेळी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहनांची उणीव भासत होती. आता तीन नवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध झाल्याने रात्रीची गस्त आणि गुन्हे नियंत्रण कामात मोठी मदत होणार आहे.कार्यक्रमाचे स्वागत पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, मोहन चाटे, रवी गिते, रोशन सरनाईक, हिंमत जाधव आणि राहुल कोकरे यांनी केले.




