स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.
विद्यार्थिनींच्या बहारदार नृत्याने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमात चैतन्य; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे
येथील ‘युवक मंडळ पुसद’ द्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. राजेश जयस्वाल सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री. कांईट सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला अभिवादन केले आणि ‘जिजाऊ वंदना’ गायनाने कार्यक्रमाची शास्त्रोक्त सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. निकीता चव्हाण हिने केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, गीतांतून आणि शेरोशायरीतून महापुरुषांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे वर्ग ९ वी ‘अ’ आणि ‘ब’ मधील विद्यार्थिनींनी सादर केलेले बहारदार नृत्य. या नृत्यासाठी मार्गदर्शक शिक्षिका कु. राठोड मॅम, कु. मार्कंडे मॅम आणि कु. शेलोडे मॅम यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक करत शिक्षकवृंदांनी त्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविले.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक राजेश जयस्वाल आणि प्रमुख पाहुणे श्री. कांईट सर यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांच्या ध्येयवादी विचारांचे महत्त्व पटवून दिले. “आजच्या युगात तरुणांनी विवेकानंदांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. रागिनी भोयर हिने केले, तर आभार श्री. पराते सर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.




