महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक.
मुख्यसंपादक – : – एस.के. चांद यांची रिपोट.
जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई
महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात अवैधरीत्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला पवन जगदीश रावते (रा. महागाव) याला महागाव पोलिसांनी आज न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. पवन रावते यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळताच पोलिसांनी दबा धरून कारवाई केली.
२५ नोव्हेंबर रोजी ग्राम महसूल अधिकारी गौतम भगत आणि मंडळ अधिकारी मारुती एकुलवार दहीसावळी शिवारातून जात असताना निळ्या रंगाचे, नंबर नसलेले रेतीने भरलेले ट्रॅक्टर त्यांना दिसले. चौकशी केली असता चालकाने आपले नाव अनिल कोरके असे सांगितले. रॉयल्टीविषयी विचारल्यावर कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. चालकाने हे ट्रॅक्टर पवन जगदीश रावते यांचे असल्याची माहिती दिली.घटनास्थळी पवन रावते येताच ट्रॅक्टर सोडण्याचा दबाव त्यांनी महसूल अधिकाऱ्यांवर टाकला. अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांनी ड्रायव्हरला ट्रॅक्टर पळवून नेण्याचे निर्देश दिले. महसूल विभागाने तत्काळ याबाबत अहवाल सादर केला आणि उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार अभय मस्के यांच्या आदेशावरून पवन रावते व अनिल कोरके यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रॅक्टर तसेच आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर भूमिगत होते.१२ डिसेंबर रोजी पवन रावते यांनी महागाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अर्ज फेटाळताच न्यायालय परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पळवून नेलेल्या ट्रॅक्टरचा शोध सुरू असून तो अद्याप जप्त करण्यात आलेला नाही. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.




