खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने 18 ते 22 एप्रिल दरम्यान मोफत आरोग्य मेळावे
नांदेड हिमायनगर, प्रतीनिधी-चांदराव वानखेडे-
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने हिंगोली लोकसभा मतदार संघात सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची तज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार ,रक्त चाचण्या आणि विविध आरोग्य संबंधी योजनेचा लाभ देण्यासाठी 18 ते 22 एप्रिल 2022 दरम्यान मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य मेळाव्यात रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असून मेळाव्याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघातील गरजू रुग्णांना प्रभावी उपचार मिळावेत याकरिता शासकीय सोबतच स्वतंत्र आरोग्य यंत्रणा सक्षम केली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात यापूर्वी सुद्धा दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करून त्याना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याच माध्यमातून मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात दि.18 ते 22 एप्रिल दरम्यान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत उपसंचालक ,जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली मेळावे होणार आहेत.
प्रत्येक तालुका स्तरावर मेळावे यशस्वी करण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून त्यामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघात पुढीलप्रमाणे आरोग्य मेळावे होतील १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली,१९ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दि. २० एप्रिल ला उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, हदगाव, किनवट, ग्रामिण रूग्णालय हिमायतनगर, येथे तर दि. २१ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बाळापूर तसेच दि. २२ एप्रिल २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय सेनगाव आणि उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे हे मेळावे होणार आहेत.
मेळाव्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत औषधी व रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत. या आरोग्य मेळाव्याचा हिंगोली नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.