क्राईम डायरी

वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.

वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.

​ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

 

पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. स्वतःच्या मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशीनच्या एका लेबलवरून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

 

​घटनेचा थरार

​सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ९ जानेवारी २०२६ रोजी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यवतमाळ पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासासाठी चार पथके तैनात केली होती.

 

​असा लागला सुगावा

​तपासादरम्यान हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील पोलीस पाटलांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी जलदरा (ता. किनवट) येथील पोलीस पाटील सुरेश वाघमारे यांनी मारोती गंगाराम डुकरे (६०) हे बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी संशयावरून मृताचा मुलगा प्रदीप मारोती डुकरे (२५) आणि पत्नी पार्वताबाई मारोती डुकरे यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

 

​’टेलर्स लेबल’ ठरले निर्णायक पुरावा

​पोलिसांनी संशयिताच्या घराची झडती घेतली असता, मृतकाच्या कपड्यांवर आणि घरातील इतर कपड्यांवर “City Mens Tailor” चे सारखेच शिलाई लेबल आढळले. या तांत्रिक पुराव्यामुळे संशय बळावला आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी प्रदीपने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.

 

​गुन्ह्याची नोंद

​बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ०२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

 

खून करून कोणताही पुरावा सोडला नसल्याने त्यात मृतकाची ओळख पटत नसल्याने तपास करणे आवघड होते. जिल्हा पोलीस आधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस आधीक्षक हनुमंत गायकवाड, गुन्हे अंवेशन पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावन्डे, यासोबत बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे, जमादार रोशन सरनाईक यांनी अतिशय कौशल्य पूर्ण तपास करून मृतकाची ओळख पटवून आरोपीस अटक केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *