बिटरगाव पोलीस हद्दीत ‘एलसीबी’ची धडक कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल.

६० हजारांचा मुद्देमाल जप्त; खरुस, टेंभुरधरा येथील धाड हुकल्याने चर्चेला उधाण
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे
बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टी आणि देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई केली आहे. मेट, ढाणकी आणि बिटरगाव शिवारात करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ५९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, हातभट्टीचा केंद्रबिंदू असलेल्या खरुस आणि टेंभुरधरा येथील धाड हुकल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिटरगाव हद्दीतील मेट व ढाणकी तसेच बिटरगाव शेत शिवारात छापे टाकले. या कारवाईत पथकाने ४८ हजार रुपये किमतीचा १२०० लिटर मोहमाच सडवा आणि ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला. त्यासोबतच ८ हजार ६० रुपयांची देशी व विदेशी दारू असा एकूण ५९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गजानन शामराव जाधव (वय ४२, रा. मेट), रमेश थावरा चव्हाण (वय ३४, रा. मेट), देविदास चंदू कवडे (रा. बिटरगाव), संतोष नारायण देवकते (वय ३५, रा. बिटरगाव) या चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत
एकडे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असतानाच, गावठी दारूचा ‘महापूर’ वाहणाऱ्या खरुस आणि टेंभुरधरा या गावांमधील धाड मात्र हुकली. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असतानाही कारवाई का झाली नाही, त्याचबरोबर या कारवाईमुळे बिटरगाव पोलीस ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यवतमाळ येथून येऊन स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करत असेल तर ठाणेदार काय करतात परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बांडे, पीएसआय शरद लोहकरे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.



