ताज्या घडामोडी

​पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!

​पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!

 

​१०० पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यापाराचे धडे

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणि श्रमाची ओढ निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला पालक आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

​कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद हुसेन सरदार यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष जुबेर शेख यांच्यासह शाळेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून उत्साहात भर घातली.

 

​मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जवळपास १०० छोटी दुकाने थाटली होती. यात प्रामुख्याने चटपटीत पाणीपुरी, समोसे, आलू वडा, दहिवडा, इडली आणि डोसा अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थांची किंमत ठरवणे, हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य यावेळी आत्मसात केले.

​याप्रसंगी मुख्याध्यापक शेख मुदस्सीर सर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “खरी कमाई अंतर्गत बाजारात वस्तू विकताना गुंतवणूक किती आणि नफा किती, याचे गणित समजणे आवश्यक आहे. त्यासोबतच प्रामाणिकपणे व्यापार करणे, दर्जेदार वस्तूंची विक्री करणे आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करणे ही काळाची गरज आहे.”

 

​हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि पालकांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांनी कमावलेला ‘नफा’ यामुळे हा उपक्रम सार्थ ठरला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *