ढाणकी शहरात कधीकाळी सुरू असलेले, नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा.- शिवसेना(शिंदे)
ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे
ढाणकी शहराला लागून असलेला बंदी भाग हा जवळपास ५० किलोमीटरच्या अंतरावरील परिसर असून , शेवटच्या टोकावरून कुठल्याही प्रशासकीय कामास उमरखेड या तालुक्याच्या ठिकाणी येऊन, दिवस दिवसभर वाट पाहून येथील नागरिकांना कधी काम झाल्यावर तर कधी रिकाम्या हाताने परतावे लागते. बंदी भागातील दराटी, खरबी, भवानी, चिखली , कोर्टा , गाडी-बोरी, थेरडी, सोनदाभी,मोरचंडी, मुरली, सहस्त्रकुंड ह्या गावच्या नागरिकांना, उमरखेड येथे येणे जाणे परवडणारे नसून, वेळ जाणे,चांगल्या रस्त्या अभावी दगदगीचा होणारा प्रवास,आरोग्यास, अपघातास आमंत्रण असणारा प्रवास यामुळे त्या लोकांची फरफट होते. कृपया या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, कधीकाळी ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय हे आठवड्यातून दोन दिवस सुरू असायचे, त्यामुळे सदर विभागातील लोकांचा वेळ वाचायचा आणि काम उमरखेडला न जाता ढाणकी येथेच होऊन जायचे. अगदी विद्यार्थ्यांच्या शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे सुद्धा ढाणकी इथूनच भेटायचे. सदर गोष्टींचा विचार करता नायब तहसील कार्यालय, आठवड्यातून दोन दिवस पूर्ववत ढाणकी येथे सुरू केल्यास संबंधित नागरिकांची होणारी गैरसोय टळेल.
अशा आशयाचे निवेदन ढाणकी शिवसेना शिंदे गटातर्फे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, शिवसेना उमरखेड तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशे, उमरखेड शहर प्रमुख ॲड. संजय जाधव, ढाणकी शहर प्रमुख संजय सलेवाड, सुनील मांजरे, शेख इरफान, सुरेश जाधव यांसह जिल्ह्यातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.




