क्राईम डायरी

विद्युत खांबावर शॉक लागून खासगी कामगार गंभीर जखमी अनंतवाडी वीज उपकेंद्राच्या ऑपरेटर वर गुन्हा दाखल

विद्युत खांबावर शॉक लागून खासगी कामगार गंभीर जखमी

 

अनंतवाडी वीज उपकेंद्राच्या ऑपरेटर वर गुन्हा दाखल

 

विद्युत खांबावर वायर जोडणीचे काम करताना शॉक लागून खासगी कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिवरंग येथे घडली. राजेंद्र भीमराव कदम (वय ४३) रा. खडका असे जखमी झालेल्या खासगी कामगाराचे नाव असून, त्याला उपचारासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र कदम हा अशोका बिडकॉन कंपनीत वायर जोडीणीची कामे करतो. ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी अशोका बिडकॉन कंपनी कडून विद्युत पोल वर एरियल बंच कंडक्टर टाकण्याचे काम खाजगी कामगारांच्या मार्फत करण्यात येत होते. लाईनमन जगताप यांच्या देखरेखीत खाजगी कामगार राजेंद्र भीमराव कदम, इंदल दयाराम जाधव, रवी पुंजाराम राकडे, दादाराव बापूराव हेडे, गजानन वामन मते आणि दत्ता बंडू गावंडे हे कामावर हजर होते. लाईनमन जगताप यांनी फोनवर परमिट घेऊन अनंतवाडी वीज उपकेंद्रावर कार्यरत असलेले ऑपरेटर दिलीप सुधाकर राजे यांना वीज पुरवठा बंद करण्याचे सांगीतले. त्यानंतर खाजगी कामगार राजेंद्र कदम हे विद्युत पोलवर चढून वायर जोडणीचे काम करीत असताना, अकस्मात विद्युत पुरवठा सुरू झाला. विजेचा जोरदार शॉक लागल्यामुळे राजेंद्र कदम विद्युत खांबावरून खाली कोसळला. या घटनेत तो गंभीररित्या जखमी झाला. त्याचे दोन्ही हात भाजल्या गेले. सहकारी कामगारांनी धावपळ करून जखमी राजेंद्रला तातडीने सवना येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजेंद्र कदम यास मोठ्या प्रमाणात मार लागला असून दोन्ही हाताची बोटे गंभीररीत्या भाजल्यामुळे निकामी होण्याची शक्यता आहे. राजेंद्र कदम यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

_____________________________

 

ऑपरेटर वर गुन्हा दाखल

 

विजेच्या खांबावर वायर जोडणीचे काम करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद ठेवण्याबाबत लाईनमन जगताप यांनी रितसर अनंतवाडी वीज उपकेंद्रावरून परमिट घेतले, परंतू हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा सुरू करण्यात आला आणि शॉक लागून एक खाजगी कामगार मृत्यूच्या दारात पोहचला. अनंतवाडी उपकेंद्राचे ऑपरेटर दिलीप सुधाकर राजे यांचा निष्काळजीपणा या दुर्घटनेस कारणीभूत असल्याची तक्रार संजय भीमराव कदम यांनी महागाव पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून ऑपरेटर दिलीप राजे यांच्या विरोधात महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

__________________________

 

खासगी वीज कामगारांसोबत वारंवार होत आहेत दुर्घटना

 

विद्युत पोल वरील बिघाड दुरुस्त करण्यासाठी लाईनमन स्वतः वर चढत नाहीत. सर्व कामे खाजगी कामगारांच्या हातून करून घेतली जातात. विज उपकेंद्रातून परमीट घेवून वीज पुरवठा बंद केल्या जातो परंतु प्रत्येक वेळी हलगर्जीपणे वीजपुरवठा सुरू केल्या जातो. यात खासगी कामगाराचा एकतर मृत्यू होतो किंवा ते गंभीर जखमी होतात. काळी (दौलत) येथे विठ्ठल सिताराम आढाव या खाजगी वायरमनचा विद्युत खांबावर बिघाड दुरुस्त करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १७ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. या घटनेनंतर १९ मार्च रोजी शुभम राठोड हा खाजगी वायरमनला खांबावर काम करताना शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना मोहदी येथे घडली. त्यापुर्वी धनोडा येथे एका खाजगी कामगारांचा विद्युत पोलवर शॉक लागून मृत्यू झाला होता. वीज वितरण कंपनीचे लाईनमन परभारे काम करून खासगी वायरमनचा जीव धोक्यात घालत असल्याचे स्पष्ट झाले असून, विद्युत उपकेंद्राचे ऑपरेटरही आपल्या कर्तव्याबाबत जागरूक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

 

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *