हिमायतनगर येथील लकडोबा चौक भागातील मटका बुकी कायमस्वरूपी बंद करावी…. बसपाचे धम्मपाल मुनेश्वर यांची मागणी .
हिमायतनगर :-शहरातील लकडोबा चौक भागात मटका बुकी बिनबोभाट चालत असून स्थानिक पोलीसांचे या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. लकडोबा देवस्थाना नजीक येत असलेल्या मटका बुकी मुळे भाविक भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सदरील वादग्रस्त मटका बुकी कायमस्वरूपी बंद करावी. अशी मागणी बसपाचे हिमायतनगर तालूका अध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनूर यांना दिलेल्या निवेदनात मुनेश्वर यांनी म्हटले आहे की, शहरात ठिकठिकाणी मटका जोरात चालू आहे. तसे मटका बुकी लकडोबा चौक भागात ही बिनबोभाट पणे चालू आहे. लकडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात. महिला पुरूष येथे दर्शनासाठी येतात. श्रावण मास, व गणेशोत्सव, दुर्गात्सव काळात येथे महिला व पुरूष भाविक येथे दर्शनास येत असतात. मंदिराजवळ पाण्याची टाकी असल्याने येथे महिला, भगिनी पाणी भरण्यासाठी येत असतात. मटका खेळ खेळणारे येथे मद्यपान करण धिंगाणा घालत असल्याने येथील शांतता भंग पावत आहे. महिला, मुलींना येथे दारूड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबींकडे जिल्हापोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ लक्ष घालून या ठिकाणची सर्वानाच त्रास दायक ठरणारी लकडोबा चौकातील मटका बुकी कायमस्वरूपी बंद करून महिला पुरूष, भाविक भक्तांना दिलासा द्यावा.अशी मागणी बहूजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी निवेदन देऊन केली आहे.