ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रितेश पुरोहित यांची निवड.
यवतमाळ : जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व रितेश मोहनलालजी पुरोहित यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र व गोवा प्रदेशाध्यक्ष रामस्वरूप पुरोहित आणि महामंत्री नरेंद्र पुरोहित यांनी केली आहे.
रितेश पुरोहित गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, “पॉलिटिक्स स्पेशल” या वृत्तपत्राचे आणि डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक आहेत. महागाव येथील मोहनलाल पुरोहित एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहे. नुकत्याच झालेल्या महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ते संचालक पदी भरघोस मतांनी निवडून आले आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण गावात उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी मोहनलाल पुरोहित एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. के.जी. पासून ते 12 वी पर्यंत दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सामाजिक कार्यात विशेष रूची असलेल्या रितेश पुरोहित यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया पारीक महासभेने त्यांचावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना रितेश पुरोहित म्हणाले, “पारीक महासभेच्या माध्यमातून जिल्ह्यातील समाजबांधवांना एकत्र करून त्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील.” त्यांच्या या निवडीचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख