स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधा पासुन वंचित…
हिमायतनगर तालुक्यातील धनवेवाडी, वडाचादरा येथील भयाण वास्तव…
मुख्य संपादक / एस.के.चांद यांची बातमी
सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशांत विविध कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात येत आहे, परंतु आजही आदिवासी पाडे त्यांच्या मूलभूत सुविधा ची मागणी करत आहेत त्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे धनवेवाडी, वडाचादरा( गट ग्राम पंचायत दुधड – वाळकेवाडी) येथे जाण्यास पक्का रस्ता सुध्दा उपलब्ध नसल्याने या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करत आपला खडतर जिवन प्रवास करावा लागतो आहे. या प्रकारच्या गंभीर बाबीकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत हे मात्र विशेष…
या करीता अनेक आंदोलन आणि रस्ता रोको करण्यात आले होते परंतु फक्त आश्वासनाशिवाय या भागांतील भोळ्या भाबड्या आदिवासी लोकांच्या नशिबी दुसरे काही हाती लागले नाही. हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरील असणाऱ्या या आदिवासी पाड्यांचा विकास करण्यास शासन हतबल असेल तर आजही आपण स्वतंत्र भारतात राहतो की पारतंत्र भारतात राहतो अशी शंका या भागतील लोकांना आता येऊ लागली आहे.
सद्या सर्व देशांत मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहेत पण आदिवासी पाड्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार झाली नाही की काय…? असा सवाल येथील आदिवासी लोकांना पडत आहे. या देशांतील मूळ मालक म्हणुन संबोधला जाणारा आदिवासी समाज आजवर आपल्या मुलभूत सुविधा आणि हक्कासाठी झगडतोय हेच या भारतीय स्वातंत्र्याचे अपयश समजावे का…? अशी खंत या भागांतील सामजिक कार्यकर्ते तानाजी वाळके यांनी व्यक्त केली आहे. दवाखाना असो की शेतीचे अन्य कामे असो या भागात जाणे येणे म्हणजे एकप्रकारे आपला जीव धोक्यात घालून प्रवास करणे होय, तसेच घरकुल योजना, राशनचा माल, आरोग्य विषयक समस्या, पिण्याचे पाणी, आदी मुलभूत सुविधा पासुन आजही या भागांतील लोकं वंचीत असल्याचे दिसून येत आहेत. या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांनी लोक वर्गणी जमा करून आणि ग्राम पंचायत कार्यालयाच्या मदतीने कच्चा रस्ता तयार केला होता पण पावसाने सर्व रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने जाणे येणे अवघड होत आहे, मागिल सरकारच्या काळात हा रस्ता तयार करावा म्हणुन निधी सुध्दा मंजुर करण्यात आला होता पण नव्याने तयार झालेल्या सरकारने या कामास हि स्थगिती दिल्याने या कामास कधी मुहूर्त लागेल हे मात्र येणारा काळच सांगेल अशी माहिती परमेश्वर बंदुके यांनी दिली आहे.
“धनवेवाडी व वडाचीवाडी येथे रस्ता व्हावा यादृष्टीने आम्ही अनेक वर्षांपासून आंदोलन, रस्ता रोको करत शासन दरबारी पाठपुरावा केला तेव्हा अर्थसंकल्पात दोन्ही वाड्यांचे रस्ते मंजूर झाले परंतु काम अद्याप सुरू झाले नाही काम लवकर सुरू झाले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल- श्री. संजय माझळकर, उपसरपंच, दूधड – वाळकेवाडी