हिमायतनगर रेल्वे स्थानकावर इंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकाचा मृत्यू़ : सर्वत्र हळहळ…..
स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेत राहणारे अंतर कमी करून अपघात टाळण्याची मागणी…
प्रतिनिधी / हिमायतनगर
नांदेड -आदीलाबाद या लोहमार्गावर असलेले हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे आज दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या इंटरसिटी आदिलाबाद नांदेड एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका युवकाचा हात घसरून रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.या घटनेमुळे रेल्वे विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाने हिमायतनगर येथील स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेत असलेला अंतर कमी करण्याकडे जातीने लक्ष देऊन पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
मागील कोरोना काळापासून हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचे काम सुरु आहे. एका बाजूचे झाले असून दुसऱ्या बाजूचे काम केले जात आहे. मात्र सदरचे बांधकाम करताना संबंधित गुत्तेदाराने मनमानी पद्धतीने प्लॅटफॉर्मचे काम केल्यामुळे काही ठिकाणी प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या मध्ये रुंदी (अंतर) ठेवण्यात आल्याचे स्थानकावर रेल्वे उभी राहिल्यानंतर दिसून येत आहे. त्यामुळे चालत्या रेल्वेतून उतरताना अथवा चढताना अनेक व्यक्ती – महिला खाली पडल्याच्या घटना घडल्या असून काहीजणांना आपला जीव गमवावा लागला हे सर्वसृत आहे.
तरीदेखील विभागीय रेल्वे अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केल्यानं ठेकेदाराने मनमानी पद्धतीने रेल्वे प्लॅटफॉर्मचे काम केल्यानं अश्या जीवघेण्या घटना घडत आहेत.अनेकदा रेल्वेची थांबण्याची वेळ हि कमी असल्याने रेल्वे पकडण्याच्या नादात प्रवाशी रेल्वेखाली येताहेत. असाच कांहींसा प्रकार हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकावर आज दि.२४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला आहे. सकाळी हिमायतनगर स्थानकावर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तालुक्यातील मौजे सवना ज. येथील युवक गौतम गणपत राऊत वय ३५ वर्ष नांदेडला जाण्यासाठी रेल्वेत चढत असताना अचानक रेल्वे सुरु झाली. त्यामुळे रेल्वेत चढताना हिमायतनगर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर हात घसरून खाली पडला. याच ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये अंतर असल्याने तो सरळ रेल्वेखाली आला. रेल्वे चालू असल्यांने त्या युवकाचे रेल्वेच्या चाकाखाली येऊन थेट दोन तुकडे होऊन रक्ताचा सडा पडला होता.
हा प्रकार लक्षात येताच तातडीने रेल्वेतील प्रवाशी व गावकऱ्यांनी रेल्वेची चैन ओढून गाडी थांबविली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यू पश्चात ४ भाऊ, पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे. मयत युवकाच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यविधी करण्यात येणार आहे. एकूणच या घटनेला रेल्वे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असून, अश्या घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी रेल्वेच्या नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकांच्या होत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या कामाकडे लक्ष देऊन नांदेडच्या धर्तीवर हिमायतनगर स्थानकावरील उभी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मधील अंतर कमी करून प्रवाश्याना सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी प्रवाश्यांनी केली आहे.