हिमायतनगर प्रतीनिधी //
दि.२९.
उमरखेड/हिंगोली/नांदेड: उमरखेड तालुक्यातील पळशी गावानजीक असलेल्या पैनगंगा नदीवरील लोकसहभागातून होणाऱ्या पुलाच्या बांधकाम स्थळाचे मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास खासदार हेमंत पाटील यांनी पाहणी केली आणि स्वतःजवळील ३० हजाराची रक्कम देणगी देऊन यापुढेही सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.खासदार हेमंत पाटील यांच्या भेटीमुळे समस्त गावकरी आनंदीत झाले.या पुलामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गावांना आरोग्यसेवा , देवदर्शन, बाजारपेठा,नातेसंबंध आणि व्यवहार, येण्या-जाण्याची सुविधा सुखकर होणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते यामुळे हे दोन प्रांत वेगळे झाले आहेत .वाहतूक सुविधेसाठी नदीवरील शासनाने केलेले पूल वगळता अनेक भागात नागरिकांना दळणवळणसाठी, आरोग्य मदतीसाठी,देवदर्शनसाठी लांबचा फेरा मारून वेळेचा आणि आर्थिक भुरदड सहन करावा लागत आहे.याचाच एक भाग म्हणजे उमरखेड तालुक्यातील पळशी गावाजवळून पैनगंगा नदी वाहते यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील गावे संपर्कापासून वंचित आहेत.मागील १० वर्षांपासून संबंधित पुलाची मागणी होत आहे सध्या तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी पुल आहे, पण तो पुरेसा नसल्याने प्रसंगी नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे .ही बाब लक्षात घेता मराठवाड्यातील माटाळा,पेवा,निवघा कवळी, आणि विदर्भातील पळशी,नागापूर, दिवटी, पिंपरी, कळमुला,पोफाळी,मनूला,शिरड या गावातील नागरिकांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जि.प.सदस्य चितंगराव कदम यांच्या पुढाकारातून
लोकसहभागातून पूल बांधण्याचे ठरवून वर्गणी गोळा केली.चितंगराव कदम यांनी आजवर लोक सहभागातून ४ पूल बांधून जनसेवेचे कार्य केले आहे.ही बाब खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी चितंगराव कदम यांच्या कार्याचा गौरव करून सर्व गावकरी नागरिकांचे अभिनंदन करून तात्काळ या ठिकाणी (दि.२७ ) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास बांधकाम स्थळाला भेट दिली.याठिकाणी मागील २० दिवसापासून कीर्तन -भजनाचा कार्यक्रम सुरू असून याठिकाणी प्रत्येक जण आपआपल्या परीने देत असलेली सेवा पाहून आणि जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद, उत्साहाने भारावून गेले यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी जनतेसमोर आपल्या भावना व्यक्त करताना स्वतःजवळील खिशातील ३० हजाराची सर्व रक्कम देणगी देऊन यापुढेही पुलाच्या बांधकामासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे म्हणत आचारसंहिता संपल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूला पोच मार्ग बनवून देण्याचे आश्वासन दिले.
खासदार हेमंत पाटील यांच्या भेटीमुळे बांधकामस्थळी सर्व नागरिक आनंदीत झाले.यावेळी नागरिक म्हणाले की, आजवर आमच्या मागणीची कोणीच साधी दखल सुद्धा घेतली नाही, परंतू खासदार साहेबांनी आमच्या कामाची दखल घेऊन भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले यामुळे आभार व्यक्त केले.यावेळी माझ्यासह शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जि.प.सदस्य चितंगराव कदम,उमरखेड शहर प्रमुख संदीप ठाकरे,उपशहर प्रमुख अतुल मैड, हदगावचे जेष्ठ पत्रकार शिवाजीराव देशमुख,वसंत सहकारी साखर कारखाना पोफळीचे माजी संचालक सुभाषराव जाधव, किर्तनकार अनुपमा पिंपलवाडकर,शिवाजी महाराज साप्तिकर,सुदर्शन पाटील व हदगाव,उमरखेड तालुक्यातील हजारो ग्रामस्थ नदीपात्रात उपस्थित होते.