प्रतिनिधी/पुसद
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज दि. 5 मे 20 रोजी मुंगशी, वरंदळी, वनोली येथे हात भट्टीवर धाड टाकून 1 लाख 22 हजार 350 रु. माल जप्त केला असून आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोना विषाणूमुळे लाॅकडाऊन असून देखील पुसद,महागाव,दिग्रसच्या खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती करून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पुसद तालुक्यातील मुंगशी, महागाव तालुक्यातील वनोली दिग्रस तालुक्यातील वरंदळी या तीन गावांमध्ये धाडी टाकल्या. या धाडीत गावठी दारूची निर्मिती करणारे व विक्री करणारे आठ जणाविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमध्ये 3 हजार 640 लिटर मोहा सडवा व 365 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 1 लाख 22 हजार 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1959 चे कलम बी सी डी ई एफ नुसार गुन्हा नोंद केला असुन वृत्त लिहोस्तोवर कारवाई सुरू होती त्यामुळे आरोपीचे नावे कळू शकली नाहीत. या तीनही ठिकाणच्या धाडीमध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष तसेच सरपंच, पोलिस पाटील, महिला बचत गट यांनी मदत केली. धाडीतच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुसदचे प्रभारी निरीक्षक राजेश तायकर,दारव्याचे दुय्यम निरीक्षक जे. व्ही. पाटील यांच्यासह सह निरीक्षक अविनाश पेंदोर, महेंद्र रामटेके, संदीप दुबे, निखील दहेलकर, यांनी संयुक्त कारवाई केली होती.
