( TV9mazap,newsनेटवर्क )
14,फेब्रुवारी,2020 नांदेड( प्रतिनिधि ) युवक काँग्रेसचा प्रदेश पदाधिकारी, विविध खात्यांचे मंत्री ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री हा यशस्वी राजकीय प्रवास कसा घडला ? या विषयीचा उलगडा उद्या दि. 14 रोजी नांदेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे उलघडणार आहेत. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी घेतलेल्या चव्हाण दांपत्याच्या मुलाखतीमधून त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पट उघडल्या जाणार आहेत.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेडसह संपूर्ण राज्यात अनेक कार्यकर्त्यांची सध्या रेलचेल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री अशोकराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी भोकरचे माजी आ.सौ. अमिताताई चव्हाण यांची सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख हे आनंदाची डोही या कार्यक्रमांतर्गत मुलाखत घेणार आहेत.
येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता ही मुलाखत होणार असून या मुलाखतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशोकराव चव्हाण यांची राजकीय जडण-घडण देशाचे नेते व केंद्रीय माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घडली. 1982 मध्ये ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून सुरूवात केली. 1987 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्क्याने ते विजयी झाले.
ना. अशोकराव चव्हाण यांचा यशाचा आलेख उंचावत जात असताना त्यांच्याकडे 1993 मध्ये राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री पदाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात 1995 मध्ये शिवसेना-भाजपाचे सरकार आले. या सरकारच्या निष्क्रीयतेमुळे 1999 मध्ये भाजपचा पराभव झाला. त्यानंतर 1999 मध्ये स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी परिवहन खात्याचे मंत्री म्हणून काम केले. पुन्हा विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात 2004 मध्ये उद्योगमंत्री म्हणून काम करताना ना. अशोकराव चव्हाण यांनी स्वतःचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्यशैलीची दखल घेत 2008 व 2009 या वर्षात दोन वेळेस त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांनी केलेले काम नांदेडकरांच्या सदैव स्मरणात राहणारे आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सुमारे 1 लाख मताधिक्क्याने विजयी होतांनाच राज्याचे बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी आपले काम सुरू केले आहे. या त्यांच्या संपूर्ण जडण-घडणीमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण या दिवंगत नेत्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांची सहचरणी म्हणून माजी आ.सौ. अमिताताई चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.
यासर्व बाबींचा उलगडा करणारा व या पलिकडे जावून आयुष्यातील बरेच काही सांगणारा त्यांचा जीवनपट माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून उलघडून घेणार आहेत. या मुलाखती विषयी संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष वेधले असून आनंदाची डोही या सदराअंतर्गत ही मुलाखत म्हणजे नांदेडकरांसाठी आनंदयात्रा ठरणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजुरकर व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 10 हजार बालचित्रकारांच्या कलेचा आज होणार आविष्कार
कुसुम महोत्सव 2020; चित्रकला व रंगभरण स्पर्धेची जय्यत तयारी
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा आविष्कार दाखविता यावा या उद्देशाने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व अग्रगन्य दैनिक लोकमत यांनी आयोजित केलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 10 हजार विद्यार्थी आपल्या कलागुणाचा आविष्कार दाखविणार आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कुसुम महोत्सवा अंतर्गत आयोजित केलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास स्पर्धेचे संयोजक आ. अमरनाथ राजुरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
चित्रकला व रंगभरण स्पर्धेची मागील 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. ही स्पर्धा नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेस होणार्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 10 हजार शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चार गटात होणार असून एलकेजी ते पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी अ गटात रंगभरण स्पर्धा होणार आहे. दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे ब, क, ड हे तीन गट तयार करण्यात आले असून या गटातील सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेसाठी सामोरे जावे लागणार आहे. या चारही गटातील स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी विषय देण्यात येणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 लाख रूपयांच्या बक्षिसांची लयलुट होणार आहे. जिल्हाभरातून 10 हजारांपेक्षा अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. स्पर्धेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून यातील विजेत्यांना येत्या विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती आ. अमरनाथ राजुरकर यांनी यावेळी दिली.